मीरा-भाईंदरमधील कोविड रुग्णालयातून एकाचवेळी 56 जणांना डिस्चार्ज

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेड झोनमध्ये असलेल्या मीरा-भाईंदरकरांना शनिवारी ‘गुड न्यूज’ मिळाली आहे. पालिकेच्या कोविड रुग्णालयातून कोरोनापासून मुक्त झालेल्या 56 जणांना आज पालिका आयुक्त, डॉक्टर आणि नर्स यांच्या उपस्थित टाळ्यांच्या गुजरात निरोप देण्यात आला. यावेळी कोरोना मुक्त झालेल्या रुग्णाच्या डोळ्यात अक्षरशः आनंदाश्रू तरळले. यामध्ये एका दोन वर्षीय चिमुकलीचाही समावेश होता.

मीरा-भाईंदर शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण 27 मार्च रोजी मिळून आला होता. यात दर चार दिवसांनी दुप्पट रुग्णाची वाढ होऊन 11 एप्रिल पर्यंत ही संख्या 102 वर पोचली. याची गंभीर दखल पालिका आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी घेतली आणि 18 एप्रिलपासून शहरातील औषध आणि दुधाची दुकाने वगळता संपूर्ण लॉकडाऊन पुकारला. या काळात नागरिकांची अडचण होऊ नये म्हणून किराणा सामना, भाजीपाला, चिकन, मटण, मासळी यांची होम डिलिव्हरी सुरू केली. याचा परिणाम दिसून आला आणि रुग्ण दुपटीचा कालावधी थेट 22 दिवसांवर पोचला आणि 18 ते 30 एप्रिल या कालावधीत यात फक्त 59 रुग्णांची भर पडली. याच कालावधीत 45 रुग्ण ठीक झाले तर 3 जणांचा मृत्यू झाला होता.

यामुळे शुक्रवारी येथील कोरोना बाधितांची संख्या 113 इतकीच राहिली होती. यातीलही 56 रुग्ण ठीक झाले, त्यामुळे येथील कोरोना बाधितांची संख्या आता 56 इतकीच राहिली आहे. यावेळी रुग्णांना निरोप देण्यासाठी महापौर ज्योत्स्ना हसनाळे आणि अपक्ष आमदार गीता जैन उपस्थित होत्या. डॉक्टर त्यांचे सर्व सहकारी, पालिका आणि पोलीस कर्मचारी यांनी घेतलेली मेहनत आणि जनतेने दिलेले सहकार्य यामुळेच कोरोनाचा विळखा सैल करणे शक्य झाले. अशी प्रतिक्रिया पालिका आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी दिली. तर राज्यातील अन्य जिल्ह्यानी मीरा-भाईंदर पॅटर्न अवलंबवा अशी प्रतिक्रिया महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांनी दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या