कोणीही उपाशी राहू नये यासाठी मीरा-भाईंदर महापालिकेने मागवली माहिती

323

मीरा-भाईंदर शहरात पोटापाण्यासाठी काम करणारे तसेच दररोज मोलमजुरी करून आपले पोट भरणारे किंवा निराधार नागरीक लॉकडाउन कालावधीत उपाशी राहू नयेत, यासाठी पालिकेने अशा लोकांची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. सुरुवातीच्या काळात किमान हजार लोकांना दोन वेळा जेवण मिळेल अशी व्यवस्था मीरा-भाईंदर महानगरपालिका प्रशासन करणार आहे.

पालिका आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी तसा निर्णय घेतला असून, या कामात सामाजिक संस्थांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी केले आहे. मीरा-भाईंदर शहर विकसित असल्यामुळे येथे अनेक बांधकामे सुरू आहेत. त्याशिवाय येथे लघुउद्योग मोठ्या प्रमाणात असल्यामुळे अनेक मजूर येथे रोजंदारी करुन आपले आणि आपल्या कुटुंबाचे पोट भरत आहेत. लॉकडाउनमुळे शहरातील सर्व कामे बंद आहेत. अशावेळी रोजंदारीवर पोट भरणाऱ्या आणि आभाळ हेच आपले घर समजून राहणाऱ्या अनेकांची दोन वेळच्या जेवणाची भ्रांत झाली आहे. त्याशिवाय अनेकजण निराधार अवस्थेत रस्त्याच्या कानाकोपऱ्यात पडलेले आहेत. अशा सर्वांची माहिती त्यांचे नावं आणि शहरातील त्यांचे राहण्याचे ठिकाण याची माहिती पालिका प्रशासनाला द्यावी, जेणेकरून त्यांना दोन वेळेचे जेवण देता येईल असे आयुक्त डांगे यांनी सांगतानाच या कामात शहरातील समाजसेवी संस्थानी मोठ्या प्रमाणात पुढाकार घ्यावा असेही आवाहन केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या