मिरज शासकीय रुग्णालय होणार कोविड रुग्णालय, अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर यांची माहिती

जिल्ह्यात वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून मिरज शासकीय रुग्णालय पुन्हा पूर्णतः कोविड रुग्णालयात रूपांतरित करण्यात येणार आहे. त्यामुळे सोमवारपासून (दि. 10) आंतररुग्ण आणि बाह्यरुग्ण विभाग पूर्णतः बंद केले जाणार असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर यांनी दिली.

सांगली जिल्ह्यात पुन्हा कोरोना संसर्गाचा उद्रेक झाला आहे. दररोज 50पेक्षा जास्त रुग्ण सापडत आहेत. गेल्या वीस महिन्यांपासून मिरजेच्या शासकीय रुग्णालयात कोरोना बाधितांवर उपचार सुरू होते. त्यामुळे बाह्य आणि आंतररुग्ण विभाग बंद ठेवावे लागले होते. मात्र, मिरज तालुक्यातील रुग्णांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन प्रशासनाने काही दिवसांपूर्वी पुन्हा बाह्यरुग्ण व आंतररुग्ण विभाग सुरू केला होता; मात्र आता हे विभाग पुन्हा बंद केले जाणार आहेत. मिरज शासकीय रुग्णालयात 350 बेड्सची क्षमता असून, 135 व्हेंटिलेटर बेड आहेत. रुग्णालयात सध्या 137 रुग्ण उपचार घेत आहेत. दररोज वाढणारी रुग्णसंख्या लक्षात घेता मिरज येथील शासकीय रुग्णालयात पुन्हा कोरोना रुग्णालयात रूपांतर केले जाणार आहे. त्यामुळे 10 जानेवारीपासून बाह्यरुग्ण विभाग आणि आंतररुग्ण विभागासह स्त्री शल्यचिकित्सा, बालरुग्ण विभाग, शस्त्रक्रिया विभाग बंद होईल. नॉनकोविड रुग्णांसाठी सांगलीच्या शासकीय सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सोय केली जाईल, असे डॉ. नणंदकर यांनी सांगितले.