स्वयंप्रेरणा देणारी मिसेस इंडिया

71

>>अदिती पाटील<<

चूल आणि मूल याच्यापलीकडे जाऊन महिलांनी विविध क्षेत्रांत प्रगती केली आहे. एवढेच नाही तर आपलं कुटुंब आणि मुलंबाळं सांभाळत ती विविध क्षेत्रात यश संपादन करत आहेत. पण काही ठिकाणी अजूनसुद्धा महिला विशेषतः गृहिणी कुटुंबाकडे लक्ष देत असताना स्वतःकडे दुर्लक्ष करतात. लग्नानंतर त्या मुलांचे करण्यात  गुरफटून जातात, पण त्याचवेळी त्यांच्यामध्ये स्वतःविषयीची जागृती निर्माण करणारी स्पर्धा ‘मिसेस इंडिया’च्या निमित्ताने घेण्यात आली. त्याला विवाहित आणि अपत्य असलेल्या महिलांनी उत्फूर्त प्रतिसाद दिला. ८ मे या मातृत्व दिनाच्या निमित्ताने आपल्या मुलांचे मनापासून संगोपन करणाऱया महिलांमध्ये स्वयंप्रेरणा निर्माण करण्याचे काम आर्चर्ज ग्रुपने केले आहे. एकंदरीतच ‘मिसेस इंडिया’ या स्पर्धेविषयी आणि त्यातील विवाहित महिलांच्या सहभागाविषयी जाणून घेऊया…

आर्चर्ज ग्रुपने ‘मिसेस इंडिया’ स्पर्धेतून महिलांना ही संधी दिली. जवळपास ३६ महिलांनी दिलेल्या उत्साही प्रतिसादामुळे यंदाचे स्पर्धेचे हे पहिले वर्ष चांगलेच गाजले. मुंबई सहारा येथे ही ‘मिसेस इंडिया’ स्पर्धा नुकतीच पार पडली. संपूर्ण देशातून स्पर्धक यामध्ये सहभागी झाले होते. स्पर्धा एकूण चार दिवस होती. या चार दिवसांत तुम्ही कसे वागता, बोलता, कसे वावरता, संवाद साधता याचाही विचार करण्यात आला. ‘मिसेस इंडिया २०१७’ मध्ये सहभागी झालेल्या स्पर्धेकांनी घेतलेली मेहनत लक्षवेधक होती. त्यांच्या मेहनतीला निरनिराळे किताब देऊन त्यांना गौरविण्यात आले. प्रत्येक महिलेमध्ये दडलेल्या सुप्तगुणांची जाणीवच त्यांना करून देण्यात आली.

पुण्याचीच असलेल्या प्रणीता तांदूळवाडकर यांना ‘कंजिनियालिटी’ म्हणजेच अनुकूल स्वभाव, साधर्म्य असा किताब मिळाला. महिलांच्या धिटाईला, दिलेली शाब्बासकीची ही थापच असे म्हणायला हरकत नाही. या स्पर्धेने विवाह झालेल्या महिलांमध्ये चेतना निर्माण केली. पर्णिताशी जेव्हा स्पर्धेविषयी बोलले तेव्हा तिने सांगितले. ‘मला पाच वर्षांचा मुलगा आहे. मी स्वतः सॉफ्ट स्किल ट्रेनर आहे. घरात जेव्हा या स्पर्धेविषयी सांगितले तेव्हा क्षणाचाही विलंब न करता माझे पती, सासू, सासरे यांनी मला पाठिंबा दिला. हेच माझ्यासाठी खूप मोलाचे होते. स्पर्धेमुळे एक वेगळा अनुभव मला मिळाला. गेल्या वर्षभरात मी स्वतः वर जे काम केले ते दाखविण्याची संधी मला मिळाली. आत्मविश्वास आणि व्यासपीठ मिळवून देणारी ही स्पर्धा आहे. माझा स्पर्धेतील हा सहभाग बघून माझ्या जवळच्या मैत्रिणींनाही आपण हे करू शकू असा विश्वास निर्माण झाला. स्वतःला सिद्ध करण्याचे हक्काचे व्यासपीठ मिळाले. पण हे करताना अर्थातच आमचे ‘ग्रुमर’ अंजना मास्कररिनस, पल्लवी कौशिक आणि कोरिओग्राफर अंजली राऊत आणि आलिशिया राऊत यांनी जे शिकविले ते खूप महत्त्वाचे होते. जे आम्हाला बरेच काही देऊन गेले.

अर्चना तोमर, तुषार धारीवाल आणि आशीष राय यांनी स्पर्धेचे आयोजन केले. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून हितेन तेजवानी, लीना मोगरे, रेशमी घोष यांनी केले. स्पर्धेतील प्रत्येक महिलेला वेगळा अनुभव देण्याचा काम स्पर्धेने केले. स्पर्धेत सहभागी झालेल्या विवाहित महिलांनी मातृत्व दिनाच्या निमित्ताने आनंद व्यक्त केला. आमच्यामध्ये दडलेल्या गुणांची ओळख करून दिल्याचे समाधान व्यक्त केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या