एव्हरेस्टवरून परतणाऱ्या २७ वर्षीय हिंदुस्थानी गिर्यारोहकाचा मृत्यू

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

उत्तर प्रदेशमधील मुरादाबादमध्ये राहणाऱ्या रवी कुमार नावाच्या गिर्यारोहकाचा एव्हरेस्टवरून परत येत असताना मृत्यू झाला आहे. २७ वर्षाच्या रवी कुमार यांनी जगातील सर्वात उंच पर्वतशिखर एव्हरेस्टवर यशस्वीरित्या चढाई केली, मात्र परत येत असताना त्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. एव्हरेस्टवर चढाईनंतर दोन दिवसांपासून त्यांच्याशी संपर्क तुटला होता. सोमवारी त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे.

शनिवारी दुपारी १.३० वाजता एव्हरेस्ट शिखर सर केल्यानंतर आपल्या चमूसोबत खाली उतरत असताना त्यांच्याशी संपर्क तुटला होता. खाली उतरताना एव्हरेस्ट बाल्कनी विभागात (गिर्यारोहकांचे अंतिम निवासस्थान) असताना त्यांचा सहकाऱ्यांशी संपर्क तुटला. नेपाळमधील हिंदुस्थानी दुतावासाने ही माहिती दिली आहे.

अरुण ट्रेक्स कंपनीचे थुपडन शेरपा यांनी दिलेल्या माहितीनुसार, रवी यांच्या मृतदेहाचा शोध घेण्यात आला होता, मात्र मृतदेह ट्रेकिंग मार्गापासून ६५० फुट खोल असल्याने तिथपर्यंत पोहचण्यात अडथळा येत होता.