तुरुंगाच्या आठवणीने झाला व्याकुळ; बाईकचोरी करून पुन्हा गेला तुरुंगात

91

सामना ऑनलाईन । चेन्नई

तीन वेळेचे जेवण, सुरक्षित आश्रयस्थान आणि काही समविचारी मित्रांची साथ… यामुळेच तामिळनाडूमधील ज्ञानप्रकाश या कैद्याचे मन घरापेक्षा तुरुंगात जास्त रमते. चोरीच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या 52 वर्षांच्या ज्ञानप्रकाश यांची नुकतीच सुटका झाली होती. मात्र, तुरुंगातील आठवणीने व्याकुळ झालेल्या ज्ञानप्रकाश याला पुन्हा तुरुंगात जाण्याची ओढ लागली. त्यासाठी त्याने रस्त्यावरील बाईक चोरली. सीसीटीव्हीमध्ये आपला चेहरा दिसेल, याची काळजीही त्याने घेतली. त्यानंतर पोलीस आपल्याला अटक करायला कधी येतील,याची वाट तो बघत होता. पोलीस आपल्याला परत तुरुंगात कधी जायला मिळेल ,यासाठी तो कासावीस झाला होता.

घरातील कुटुंबीय आपली काळजी घेत नाहीत. तुरुंगात आपल्याला घरच्यापेक्षा खूप सुरक्षित आणि चांगले वाटते, असे त्याने सांगितल्याची माहिती तंबरमचे सहपोलीस आयुक्त पी. अशोकन यांनी दिली. आपल्याला तुरुंगातील वातावरण आवडत असल्याचे ज्ञानप्रकाशने सांगितले. न्याहरी आणि दोन वेळेचे जेवण वेळच्यावेळी मिळते. तुरुंगात कोणीही टीकाटिप्पणी करत नाही. टोमणे मारत नाही. आळशी म्हणून हेटाळणी करत नाही. काही समविचारी मित्र मिळाल्याने वेळ मजेत जातो. त्यामुळे आपल्याला पुन्हा तुरुंगात जाण्याची ओढ लागली होती. तुरुंगात मैत्री झालेल्या काही मित्रांना भेटण्याचीही इच्छा होती, असे तो म्हणाला. चोरीच्या आरोपामुळे त्याला मार्च महिन्यात अटक करण्यात आली होती. मात्र, 29 जूनला तुरुंगाबाहेर पडल्यानंतर आपल्या खडतर जीवनाला सुरुवात झाली असे त्याने पोलिसांना सांगितले. आपली बायको आणि मुले आपली हेटाळणी करतात. घरी वेळच्यावेळी जेवणही मिळत नाही. त्यामुळे आपल्याला पुन्हा तुरुंगात यायचे होते, असेही तो म्हणाला.

पुन्हा तुरुंगात जाण्यासाठी कैलासपुरमच्या रस्त्यावर उभी असलेली बाईक त्याने चोरली. त्यावेळी सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसेल, याची काळजी त्याने घेतली. तसेच पोलिसांनी आपल्याला पकडावे यासाठी तो बाईकवरून शहरात फिरू लागला. बाईकमधील पेट्रोल संपल्यावर रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांमधील पेट्रोल चोरायला त्याने सुरुवात केली. पेट्रोल चोरताना स्थानिकांनी त्याला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी अटक केल्यावर आपण पेट्रोल आणि बाईक चोरल्याची कबुली त्याने दिली. बाईक चोरल्याची तक्रार दाखल झाली होती. त्यानुसार ज्ञानप्रकाशने बाईक चोरल्याचेही उघड झाले. तुरुंगाबाहेरील आपले जीवन खडतर आहे, त्यामुळे आपल्याला पुन्हा तुरुंगात पाठवावे, अशी मागणी त्याने केली. बाईकचोरीचा सहजतेने उलगडा झाल्यामुळे पोलिसही खूश आहेत. तर पुन्हा पुजंल येथील तुरुंगात रवानगी झाल्याने ज्ञानप्रकाशलाही आनंद झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या