संगमरवरी कबरीत प्रेयसीचे प्रेत दडवणारा प्रियकर अटकेत

सामना ऑनलाईन, भोपाळ

एका बेपत्ता झालेल्या मुलीचा शोध घेत भोपाळमध्ये आलेल्या पश्चिम बंगाल पोलिसांना कबर खोदावी लागली. कबर खोदल्यानंतर बेपत्ता मुलीचा मृतदेह सापडलाच शिवाय त्यांना हादरवून टाकणारी गोष्टही समोर आली. जी मुलगी बेपत्ता झाली होती तिचं नाव आकांक्षा (२८ वर्ष) होतं. तिच्या घरच्यांसोबत संपर्क तुटल्याने आणि तिचा काहीच पत्ता लागत नसल्याने तिच्या घरच्यांनी पोलिसांत तक्रार केली होती.

पश्चिम बंगालच्या पोलिसांना उद्यान दास (३२ वर्ष) नावाच्या तरूणाचा पत्ता मिळाला, पोलीस त्याच्या घरी धडकले तेव्हा काही काळ तो माहिती द्यायला नकार देत होता. मात्र पोलीसी खाक्या दाखवल्यानंतर तो सरळ झाला आणि त्याने बोलायला सुरूवात केली. उद्यानने सांगितलं की त्याची आणि आकांक्षाची फेसबुकवरून मैत्री झाली होती. दोघं लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत होते. डिसेंबर २०१६ ला दोघांमध्ये भांडण झालं, रागाच्या भरात उद्यानने आकांक्षाचा गळा आवळून खून केला.

उद्यानने आकांक्षाचा खून केल्यानंतर तिचा मृतदेह एका लोखंडी ट्रंकमध्ये भरला. त्या ट्रंकमध्ये सिमेंट भरलं आणि ती ट्रंक दुसऱ्या ट्रंकमध्ये भरली. दुसऱ्या ट्रंकमध्येही त्याने सिमेंट भरलं आणि संगमरवराच्या कबरीमध्ये ट्रंक लपवली. उद्यान दासने आकांक्षाबरोबर लग्न केल्याचा दावा केलाय मात्र त्याच्या विधानांमध्ये तफावत आढळत असल्यानं पोलिसांना या गोष्टीवर विश्वास नाहीये. पोलीस त्याचा तपास करत असून ज्या दिवशी आकांक्षाचा मृत्यू झाला त्या दिवशी नेमकं काय घडलं हे चौकशीनंतरच कळू शकेल.