नगरमधील ‘त्या’ बेपत्ता तरुणाचा शोध लागला, मित्राच्या मदतीने मुंबईतून घेतले ताब्यात

गेल्या चार दिवसापासून बेपत्ता असलेल्या नगरमधील तरुणाचा शोध घेण्यास अखेर नातेवाईक आणि पोलिसांना यश आले आहे. पॅलेस्टाईनला जाण्याच्या तयारीत असलेल्या सदर तरुणाला तोफखाना पोलिसांनी मुंबईतून ताब्यात घेतले आहे. पुढील चौकशीसाठी तरुणाला गुप्तचर विभाग आणि दहशतवादविरोधी पथकाच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

सदर 20 वर्षीय तरुण 2 ऑगस्टपासून बेपत्ता झाला होता. याप्रकरणी त्याच्या वडिलांनी तोफखाना पोलिसात तो बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. पोलिसांकडून तरुणाचा शोध सुरु असतानाच त्याने एका मित्राला फोन केला. तरुणाने इन्स्टाग्रामवरुन मित्राला फोन करुन मुंबईला बोलावले. मी तिकडे जाणार आहे, तू मुंबईत ये, तुला काम मिळवून देतो असे त्याने मित्राला सांगितले.

मित्राने तात्काळ ही बाब तरुणाच्या वडिलांना सांगितली. यानंतर तोफखाना पोलिसांना माहिती देण्यात आली. यानंतर नातेवाईकांसह पोलिसांनी मुंबई गाठली आणि तरुणाला ताब्यात घेतले. पोलिसांनी तरुणाचा प्राथमिक जबाब नोंदवून पुढील चौकशीसाठी त्याला गुप्तचर विभाग व दहशतवाद विरोधी पथकाकडे सुपूर्द केले. तरुणाची कसून चौकशी सुरु आहे. तसेच त्याचा मोबाईलही तपासण्यात येत आहे.