बेपत्ता युवकाचा तब्बल सहा वर्षानी शोध, मालवण कट्टा पोलिसांच्या शोध मोहिमेचे सर्वत्र कौतुक

तब्बल सहा वर्षे बेपत्ता असलेल्या युवकाचा शोध घेत मालवण कट्टा पोलिसांनी त्याला आई वडिलांच्या स्वाधीन केले. त्यावेळी मुलाच्या भेटीने आई वडिलांच्या अश्रूंचा बांध फुटला. यावेळी खाकी वर्दीही गहिवरली.

अरुण विजय गावडे (वय 24) हा मालवण तालुक्यातील गोळवण या गावातील युवक जून 2014 पासून आपल्या आई वडिलांना कामानिमित्त गोवा येथे जात असल्याचे सांगून निघून गेला होता. त्यानंतर काही दिवस आई वडिलांच्या संपर्कात असलेला अरुणचा संपर्क बंद झाला. गेली 6 वर्षे त्याचा कोणताच पत्ता नव्हता. याबाबत आई वडीलांनी कट्टा पोलीस ठाण्यात आपला मुलगा हरवला असल्याची तक्रारही दाखल केली होती. अनेक वर्षे लोटली. परंतु मुलाचा पत्ता लागत नव्हता.

एकुलता एक मुलगा परत यावा मिळावा यासाठी आई वडिलांनी अनेक उपास केले, नवस केले. अखेर त्याच्या हाकेला परमेश्वर धावला तो कट्टा पोलीस ठाण्यातील पोलीस रुक्मांगद मुंडे, योगेश सरफदार आणि संतोष पुटवाड यांच्या रूपाने. अरुण गावडे याचे जुन्या नंबरचे सिमकार्ड मुदत संपल्याने बंद होणार होते. त्यासाठी त्या सिमकार्डवर रिचार्ज करण्यासाठी सिम कार्ड खरेदी करताना दिलेल्या पर्यायी नंबरवर कंपनीकडून जून महिन्यात फोन करण्यात आला. तो पर्यायी नंबर अरुण याच्या आई वडिलांकडे होता.

याबाबत त्याच्या आई वडिलांनी पोलीस ठाण्यात जाऊन सांगितली. कट्टा पोलिसांनी पुन्हा त्या कंपनीला संपर्क साधून त्या सिमकार्डचे लोकेशन मिळवले. मात्र तो नंबर बंद असल्याने पुढील लोकेशन मिळत नव्हते. लॉकडाऊन असल्याने राज्याच्या सीमा बंद असल्याने थेट तपासात अडचणी होत्या. मात्र नंबर सेव्ह करून सिम ट्रॅकरच्या माध्यमातून तपास सुरू होता.

दरम्यान, पोलिसांनी मोबाईल तो नंबर सेव्ह केला. तेव्हा त्यावर अरुण याचा एक फोटो दिसला. तो फोटो पोलिसांनी सेव्ह करून त्या दृष्टीनेही तपास सुरू केला. अरुण याच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन पणजी येथे दाखवत असलेल्या परिसरात दुकाने, हॉटेल येथेही संपर्क साधून फोटोद्वारे तपासाची चक्र सुरू होती. लॉकडाऊन काहीसे शिथिल झाल्याने पोलिसांनी तपासाची चक्रे अधिक गतिमान करत मालवण पोलिसांचे कट्टा दुरक्षेत्राचे रुक्मांगद मुंडे, योगेश सरफदार आणि संतोष पुटवाड हे पोलीस पथक गोवा पणजी येथे दाखल झाले.

फोटोतील ड्रेसकोड ठरला महत्वाचा दुवा
अरुण यांचा मोबाईल डीपी असलेला त्या फोटोच्या आधारे तपास सुरू असताना एका व्यक्तीने फोटोतील ड्रेसकोड जवळच असलेल्या ब्लॅक मार्केट हॉटेलचा असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी ते हॉटेल गाठले असता अरुण गावडे सापडला.

पुढील शिक्षणाचे स्वप्न पूर्ण न झाल्याने…
घरची परिस्थिती बेताची मात्र शिक्षणात हुशार असलेल्या अरुण याचे नवोदय विद्यालयात 12 पर्यंत शिक्षण झाले. त्यांनंतर काही दिवस गावी आई वडिलांसोबत राहून नोकरी करून पुढील शिक्षण या उद्देशाने तो गोवा येथे गेला. मात्र मेडिकल शिक्षणाचे स्वप्न पूर्ण न झाल्याने काहीसे नैराश्य आले. त्यांने नोकरीची वाट पत्करली. घरच्यांशी संपर्क केलाच नाही असे अरुण यांने सांगितल्याचे पोलिसांनी सांगितले. सर्व जबाब माहिती नोंद करून पोलिसांनी अरुण याला मंगळवारी (20 ऑक्टोबर) गोवा येथून सिंधुदुर्गात आणले. मालवण कट्टा पोलीस ठाण्यात आई वडिलांना बोलावून अरुण याला त्यांच्या स्वाधीन करण्यात आले.

आई वडिलांच्या डोळ्यात अश्रूंच्या धारा
एकुलता एक मुलाचा गेली सहा वर्षे कोणताही शोध लागत नसल्याने पूर्णपणे खचून गेलेले आई वडील मुलाच्या वाटेकडे डोळे लावून होते. अखेर अरुण याला पाहताच गहिवरून गेले. त्यांच्या डोळ्यात अश्रूंच्या धारा लागल्या. मुलाच्या भेटीचा आनंद व्यक्त करत पोलिसांचे आभार मानताना त्या आईवडिलांना शब्दही फुटत नव्हते. यावेळी खकी वर्दीही गहिवरली. तब्बल सहा वर्षे बेपत्ता असलेल्या अरुण याचा शोध घेत आई वडिलांसोबत त्याची भेट घडवून आणणाऱ्या मालवण कट्टा दुरक्षेत्र पोलिसांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या