राजकीय गुढी, महाराष्ट्रासह सात राज्यांमध्ये मिशन २०१९

41

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

उत्तर प्रदेश आणि बिहारमधील पोटनिवडणुकीत तीन जागांवर भाजपचा पराभव झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी-पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांच्या ‘मिशन २०१९’चे काय होणार यावर राजकीय निरीक्षकांमध्ये चर्चा रंगू लागल्या आहेत. त्यात २०१४ सालातील भाजपच्या ऐतिहासिक कामगिरीत सिंहाचा वाटा असलेल्या महाराष्ट्रासहित ७ राज्यांमध्येच यावेळी आव्हानात्मक परिस्थिती राहील, असा अनेकांचा होरा आहे.

महाराष्ट्रासहित सात राज्यांत भाजपसाठी परिस्थिती प्रतिकूल बनण्याची कारणे निरनिराळी आहेत. काही ठिकाणी नवी समीकरणे आकार घेऊ लागल्यामुळे परिस्थिती बदलली आहे, तर काही ठिकाणी भाजपने मित्रपक्षांना दुखावल्याने वातावरण पालटले आहे.

हार्दिक, अल्पेश ठाकोर, जिग्नेश मेवानीमुळे भाजपला धोका
गुजरात हा कायम भाजपचा गड मानला गेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा हे दोघेही त्याच राज्याचे. मागील लोकसभा निवडणुकीत भाजपने सर्वच्या सर्व म्हणजे २६ जागा जिंकल्या होत्या. पण पटेल समाजाचे हार्दिक पटेल, ओबीसी समाजाचे अल्पेश ठाकोर, दलित समाजातील आमदार जिग्नेश मेवाणी या तीन युवा नेत्यांच्या उदयामुळे गुजरातमध्ये नवी समीकरणे तयार झाली आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत भाजप हरता हरता बचावला. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत युवा नेतृत्वामुळे भाजपला धोका वाढला आहे.

मध्य प्रदेश, राजस्थानात काँग्रेस मजबूत
मध्य प्रदेश, राजस्थान या दोन राज्यांत काँग्रेस मजबूत बनली असून अलीकडेच झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपला पराभव पत्करावा लागला आहे. मागील लोकसभा निवडणुकीत भाजपने मध्य प्रदेशात २९ पैकी २७ जागा जिंकल्या होत्या, तर राजस्थानात सर्वच्या सर्व म्हणजे २७ जागांवर भाजप विजयी झाला होता. पण २०१९ मध्ये भाजपशी कडवी टक्कर देण्याच्या तयारीत काँग्रेस आहे.

महाराष्ट्रात शिवसेनेची भूमिका महत्त्वाची
महाराष्ट्र हे उत्तर प्रदेशनंतरचे देशातील मोठे राज्य असून तिथे लोकसभेच्या ४८ जागा आहेत. मागील लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना एकत्रित लढले होते. त्यात भाजपला २३ आणि शिवसेनेला १८ जागा मिळाल्या होत्या. पण लोकसभा निवडणुकीनंतर भाजपने युती तोडल्यामुळे विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना हे स्वबळावर लढले होते. आता एनडीएमध्ये भाजपने अनेक मित्रपक्षांचा रोष ओढवून घेतला आहे. चंद्राबाबू नायडू यांचा ‘तेलगू देसम’ तर एनडीएतून बाहेर गेला आहे. त्यामुळे शिवसेना-भाजप यांच्यातील ताणेबाणे पाहता २०१९ मध्ये शिवसेनेची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील चित्र काय असेल, हा सध्या चर्चेचा

बिहारमध्ये लालू-मांझी यांच्यामुळे नवी समीकरणे
बिहारमध्ये लोकसभेच्या ४० जागा आहेत. मागील निवडणुकीत भाजपला २२ तर त्यांच्या मित्र पक्षांना ९ जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी लालूप्रसाद यांचा राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस यांची युती होती. तर, नितीश कुमार यांचा जदयु स्वतंत्रपणे लढला होता. आता जदयु हा भाजपसोबत असला तरी भाजपच्या मार्गात अडचणी वाढू लागल्या आहेत. लालूप्रसाद यांनी मुस्लिम, यादव या व्होट बँकेबरोबरच अति दलित आणि अति मागास समाजांवर सारे लक्ष केंद्रित केले आहे. माजी मुख्यमंत्री जितनराम मांझी यांनी भाजपची साथ सोडून लालूप्रसाद यादव यांच्याशी केलेली ‘आघाडी’ त्याचेच फलित आहे. तसेच बिहारमध्ये भाजपचे मित्र उपेंद्र कुशवाह हे आगामी निवडणूक भाजपसोबत राहून लढणे अशक्य मानले जात आहे.

आंध्रात भाजप नव्या मित्राच्या शोधात
आंध्र प्रदेशात लोकसभेच्या २५ जागा आहेत. मागील निवडणुकीवेळी चंद्राबाबू नायडू यांचा तेलगू देसम आणि भाजप यांची युती होती. त्यामुळे तेलगू देसमला १५ तर भाजपला २ जागा मिळाल्या होत्या. आता मोदी सरकारने केलेल्या अन्यायामुळे तेलगू देसम एनडीएतून बाहेर पडला आहे. भाजपवर तिथे आता नव्या मित्राचा शोध घेण्याची वेळ आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या