हिंगोलीत शाळकरी विद्यार्थ्यांचे ’मिशन नो टोबॅको’

सामना प्रतिनिधी । हिंगोली

हिंगोलीमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांनी रविवारी स्वयंस्फुर्तीने ’मिशन नो टोबॅको’चा नारा देत हिंगोली शहरातुन फलक हातात घेऊन जनजागृतीपर रॅली काढली. तंबाखू, तंबाखुजन्य पदार्थ तसेच व्यसनापासून दूर होण्याचे आवाहन करणारे नारे देत या विद्यार्थ्यांनी हिंगोली शहर दणाणून सोडले.

हिंगोली शहर व ग्रामीण पोलीस ठाण्यासमोर येऊन देखील या विद्यार्थ्यांनी जागृती केली. माजी नगराध्यक्ष जगजीत खुराणा व पोलीस कर्मचारी संदिप जाधव, उमेश जाधव, शेख शकील, जीवन मस्के, मुजीब शेख या पोलीस कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांच्या मोहिमेला पाठींबा दिला. ’सामना’ प्रतिनिधीने या विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्या उपक्रमाबाबत संवाद साधला. शहरातील आशीतोष बोहरा, पुरब डोड्या, कृष्णा गुप्ता, अद्वैत बगडिया, नमन सोनी, अथर्व भट्ट, अमित कदम, पार्थ पुरोहित, आशीतोष जोशी, ओम दुबे, अनुज भट्ट, आदित्य जोशी या बारा विद्यार्थ्यांनी एकत्र येत ही रॅली काढली.

सुट्टीच्या दिवशी काही सामाजिक उपक्रम करावा काय? अशी दोन मित्रामध्ये चर्चा झाली आणि वेगवेगळ्या तीन इंग्रजी शाळेत शिकणाऱ्या मात्र एकमेकांची ओळख असलेल्या या बारा जणांनी व्यसनाधिनतेपासून समाजातील काही घटकांना दुर लोटण्यासाठी रविवारी रॅली काढण्याचे ठरविले. स्वत:च्या हस्ताक्षरातच फलक बनविण्याचे काम आशीतोषने पूर्ण केल्याचे सांगितले. ‘तंबाखू, चुना हाय हाय’, ‘सिगरेट विडी बाय बाय’, ‘विमल सितार मरवायेगा- दूध बिस्कीट बचायेगा’, ‘स्टॉप स्मोकींग’, ‘मिशन नो टोबॅको’, ‘बापु को तुम याद करो बिअर को तुम इन्कार करो’ असे वेगवेगळे फलक हाती घेऊन व्यसनांविरोधात नारेबाजी केली.