नक्षलवादी समजून होमगार्ड जवानाला ठार मारले, बिहारमधील धक्कादायक प्रकार

प्रातिनिधिक फोटो

नक्षलवादी समजून पोलिसांनी एका होमगार्ड जवानाला गोळ्या घातल्याचा प्रकार बिहारमधील मुंगेर जिल्ह्यातील बरायापूर पोलीस स्थानकात घडला. मोहम्मद झाहीद (वय – 48) असे या होमगार्ड जवानाचे नाव असून मंगळवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने याबाबत वृत्त दिले आहे.

मुळचा बाकरपूर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या मोहम्मद झाहीद याची चार दिवसांपूर्वी बरियारपूर पोलीस स्थानकात बदली झाली होती. झाहीद मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याने नैराश्यात होता. सोमवारी रात्री पावणे बाराच्या सुमारास बंदोबस्ताकरिता उभा असताना त्याने अचानक स्वत:कडील सर्व्हिस रायफलमधून गोळीबार सुरू केला. गोळीबाराच्या आवाजाने हा नक्षलवादी हल्ला असल्याचे समजून ड्यूटीवर तैनात असलेल्या पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला.

रात्रीच्या सुमारास मिट्ट काळोख असल्याने पोलिसांना होमगार्ड मोहम्मद झाहीद दिसला नाही. अखेर पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात होमगार्ड जवान मोहम्मद झाहीद ठार झाला. मंगळवारी पहाटेच्या सुमारास मृतदेहाची ओळख पटली तेव्हा पोलीस स्थानकात नुकताच बदली होऊन आलेल्या मोहम्मद झाहीद याचा हा मृतदेह असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.

एसपी मानवजीतसिंह धिल्लोन यांनी याबाबत दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद हा प्रचंड मानसिक तणावाखाली होता. तो स्वत:च्या सर्व्हिस रायफलने पोलीस ठाण्यात गोळीबार करत होता. त्यावेळी ड्यूटीवर असलेल्या पोलिसांनी नक्षलवादी हल्ला झाल्याचे समजून मोहम्मद झाहीदच्या दिशेने गोळीबार केला आणि यात त्याचा मृत्यू झाला. याबाबत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे अहवाल पाठवण्यात आल्याचेही धिल्लोन यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या