
देशात तपास यंत्रणांचा गैरवापर सुरू आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची ईडीकडून चौकशी केली जात आहे. आतापर्यंत राष्ट्रवादीच्या दहा लोकांची चौकशी झाली. निष्पन्न काहीच झाले नाही. अनिल देशमुख यांच्यावर आरोप झाले. त्यातून काहीच पुढे आलेले नाही. चुकीची कामे करणाऱयांना संरक्षण आणि चांगले काम करणाऱयांना त्रास दिला जात असल्याची घणाघाती टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी केली. महाविकास आघाडीमध्ये कसलाही वाद नाही. तिन्ही पक्षांचे नेते एकत्र बसून जागा वाटपाबाबत निर्णय घेतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
पुण्यातील एका कार्यक्रमानंतर पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. पवार म्हणाले, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरोधामध्ये किती तक्रारी आहेत याबाबतची माहिती सरकारने घेतली पाहिजे. नवाब मलिक यांनी वानखेडे यांच्याबद्दल जे काही सांगितले होते ते खरे ठरले आहे. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांची चौकशी केली जात आहे. विरोधी पक्षातील नेत्यांच्याही चौकशा होत आहेत, यावरून सरकारची भूमिका काय आहे ते दिसून येते.
निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता
कर्नाटक निवडणुकीमध्ये भाजपचा दारुण पराभव झालेला असल्याने राज्यातल्या निवडणुका कधी होतील, हे सांगता येणार नाही, परंतु आगामी निवडणुका लांबणीवर पडू शकतात, असा अंदाज शरद पवार यांनी वर्तवला.
दोन हजाराच्या नोटांसंदर्भात लहरी माणसाप्रमाणे निर्णय
एखाद्या लहरी माणसाने निर्णय घ्यावा तसा दोन हजार रुपयांची नोट चलनातून मागे घेण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. मागच्या वेळी असाच निर्णय घेतला होता. त्यात खूप लोकांचे नुकसान झाले. पुणे जिल्हा सहकारी बँकेत काही कॅश होती. काही कोटींमधील ही रक्कम बदलून दिली नाही त्यामुळे बँकेचे आर्थिक नुकसान झाले. कोल्हापूर मध्यवर्ती बँकेचीही अशीच परिस्थिती झाली होती. अशा प्रकारचे निर्णय घ्यायचे, त्यानंतर ज्यांची गुंतवणूक आहे त्यांना बदल करून द्यायची जबाबदारी पाळायची नाही. आम्ही काहीतरी वेगळे करतो आहे असे दाखवायचे. नोटाबंदीने देशात चमत्कार होईल असे सांगण्यात आले, पण देशात चमत्कार एवढाच झाला की, अनेक लोकांनी आत्महत्या केल्या. व्यावसायिक उद्ध्वस्त झाले. या चमत्कारानंतर आता पुढे काय म्हणून हा दुसरा चमत्कार केलेला आहे. या निर्णयाचे पुढे काय होतंय ते बघूयात, अशा शब्दांत पवार यांनी पेंद्र सरकारवर टीका केली.