हिंदुस्थानी संघाने धर्मशालाच्या खेळपट्टीचा धसका घेतलाय! मिचेल जॉन्सनची मुक्ताफळे

26

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

मैदानातील स्लेजिंगसोबतच कांगारूंनी अखेरच्या धर्मशाला कसोटीत यश मिळविण्यासाठी ‘माइंड गेम’चा उपद्व्याप सुरूच ठेवला आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सन याने तर धर्मशालाच्या वेगवान गोलंदाजीला अनुकूल खेळपट्टीचा टीम इंडियाने धसका घेतलाय. शेवटची कसोटी गमावून आपण मायदेशात मालिका गमावण्याची नामुष्की पत्करू अशी भीती विराट सेनेला भेडसावतेय अशी मुक्ताफळे ‘फॉक्स स्पोर्टस्’ वाहिनीशी बोलताना उधळली आहेत.

शनिवारपासून सुरू होणाऱ्या चौथ्या कसोटीची धर्मशालाची खेळपट्टी व तेथील वातावरण हे वेगवान गोलंदाजीला अनुकूल आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियन संघ निश्चित मनाने धर्मशालाला जाणार आहे असे सांगून जॉन्सन म्हणाला, धर्मशालात फिरकीवीर ओकिफऐवजी वेगवान गोलंदाज जॅक्सन बर्डला ऑस्ट्रेलियन संघात खेळवणे लाभदायक ठरेल. प्रमुख ‘ऑफस्पिनर’ नॅथन लायन मात्र संघात हवा. कारण अशा खेळपट्टीवर तो चेंडू अधिक उसळवून हिंदुस्थानी फलंदाजांना त्रास देऊ शकतो, असेही जॉन्सनने सांगितले.

रांची कसोटीने मनोधैर्य वाढवले

बंगळुरू कसोटीतील पराभवात काहीसा नाऊमेद झालेल्या ऑस्ट्रेलियन संघाने तिसरी रांची कसोटी अनिर्णीत राखून आपली लढाऊ क्षमता दाखवलीय. रांचीतील स्तुत्य कामगिरीने ऑस्ट्रेलियन संघाचे मनोधैर्य वाढले आहे. कर्णधार स्टिव्ह स्मिथपाठोपाठ हॅण्डस्कोम्ब व शॉन मार्शने झुंजार खेळ करीत अखेरच्या लढतीत संघाला विजयाची आशा दाखवलीय. आता आपल्या वेगवान गोलंदाजांनी धर्मशालात प्रभावी कामगिरी करून बॉर्डर-गावसकर ट्रॉफी स्वतःकडेच राखायला हवी असेही प्रतिपादन मिचेल जॉन्सनने शेवटी केले.

 

आपली प्रतिक्रिया द्या