हातात बीअरची बाटली अन् वर्ल्ड कप ट्रॉफी पायाखाली! मिचेल मार्शच्या उन्मादाने क्रिकेटप्रेमींमध्ये संतापाची लाट

ऑस्ट्रेलियाने यजमान टीम इंडियाचा विजयरथ रोखून क्रिकेट वर्ल्ड कपच्या कारकिर्दीत सहाव्यांदा जगज्जेते पदाच्या करंडकावर आपले नाव कोरले. मात्र अष्टपैलू मिचेल मार्शच्या हातात बीअरची बाटली अन् पायाखाली वर्ल्ड कपची ट्रॉफी असलेला पह्टो सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे. त्याच्या या उन्मादी कृत्यामुळे क्रिकेटप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. सोशल मीडियावर सध्या मार्शवर क्रिकेट जगतातून टीकेची झोड उठली आहे.

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने मिचेल मार्शचा हा पह्टो सोशल मीडियावर शेअर केला. मार्शने विश्वचषकावर ठेवलेल्या पायांची कृती कोणालाही आवडली नाही. हिंदुस्थानी क्रिकेटप्रेमींनी  सचिन तेंडुलकरचा विश्वचषकासोबतचा पह्टो शेअर करून त्याची तुलना मार्शच्या या पह्टोसोबत केली. सचिनने या पह्टोमध्ये विश्वचषकाच्या ट्रॉफीला जवळ घेतल्याचे पाहायला मिळत आहे. पंरतु मिचेल मार्शकडून मात्र या ट्रॉफीचा अपमान झाल्याचं चाहत्यांनी पाहिलं. जगज्जेते पदाचा करंडक जिंकल्यानंतर मिचेल मार्श ड्रेसिंग रूममध्ये ट्रॉफीवर पाय ठेवून बसलेला दिसला. त्याच्या एका हातात बिअर आणि त्याचे दोन्ही पाय विश्वचषकाच्या ट्रॉफीवर असल्याचे या पह्टोत स्पष्टपणे दिसत आहे. त्यावर बरीच टीका होत आहे. मार्शची ही वागणूक साफ चुकीची आहे. जगज्जेते पदाच्या ट्रॉफीबद्दल काही आदर ठेवला पाहिजे, अशा शब्दांत सोशल मीडियावर मिचेल मार्शचे कान टोचले जात आहेत.