विजयाचा उन्माद! मिशेल मार्श विश्वचषकावर पाय ठेऊन बसला, नेटकऱ्यांनी फटकारले

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर झालेल्या अंतिम लढतीत यजमान हिंदुस्थानचा पराभव करत ऑस्ट्रेलियाने विश्वचषक जिंकला. हिंदुस्थानने दिलेल्या 241 धावांचा ऑस्ट्रेलिया ट्रॅव्हिस हेडच्या शतकी खेळीच्या बळावर यशस्वी पाठलाग तर विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा विश्वचषकाचा कारनामा केला. या कामगिरीमुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मात्र याच दरम्यान ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मिशेल मार्श (Mitchell Marsh) याचा एक फोटो व्हायरल झाला असून यामुळे त्याच्यावर टीकेचा भडिमार सुरू आहे.

विश्वचषक जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाने ड्रेसिंग रुममध्ये शॅम्पेनच्या बाटल्या उघडून तुफान जल्लोष केला. या दरम्यान, मिशेल मार्श विश्वचषकावर पाया ठेऊन बसला. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याने त्याच्या इन्स्टाग्राम प्रोफाईलवर हा फोटो शेअर केला आहे. मात्र विजयाचा हा उन्माद चाहत्यांना आवडलेला नाही. अनेकांनी हा फोटो शेअर करत मिशेल मार्शवर निशाणा साधला असून आयसीसीला हस्तक्षेप करण्याचीही मागणी केली आहे.

विश्वचषकावर पाय ठेवल्याने क्रीडाप्रेमी भडकले आहेत. विश्वचषकाचा थोडा तरी आदर ठेव, अशा शब्दात चाहत्यांनी मार्शला फटकारले. मात्र ऑस्ट्रेलियाच्या चाहत्यांनी ही सामान्य बाब असल्याचे म्हटले आहे.