डीएमकेमध्ये स्टॅलीनच ‘बाहुबली’; अध्यक्षपदी निवड

सामना ऑनलाईन। चैन्नई

डीएमकेचे संस्थापक आणि तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री करुणानिधी यांच्या निधनानंतर पक्षाचा आणि करुणानिधी यांचा उत्तराधिकारी कोण या वादाला आता पूर्णविराम मिळाला आहे. पक्षाच्या मंगळवारी झालेल्या महासभेत पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष स्टॅलीन यांची अध्यक्षपदी निवड करून त्यांच्या नावावर उत्तराधिकारी म्हणून शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. तसेच पक्षाचे वरिष्ठ नेते दुरईमुरगन यांची पक्षाच्या खजिनदारपदी निवड करण्यात आली आहे.

चैन्नईतील पक्षाच्या मुख्यालयात या सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. पक्षाचा उत्तराधिकारी या बैठकीत ठरणार असल्याने याबाबत उत्सुकता होती. स्टॅलीन यांची पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यावर त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला. सोशल मीडियावर DMKThalaivarStalin हा हॅशटॅग मंगळवारी टॉप ट्रेंडमध्ये आहे. स्टॅलीन यांनी अध्यक्षपदासाठी रविवारी अर्ज दाखल केला होता. तर खजिनदार पदासाठी पक्षाचे प्रधान सचिव दुरईमुरगन यांनी अर्ज दाखल केला होता. कार्यकारी अध्यक्ष आणि खजिनदारपद आतापर्यंत स्टॅलीन यांच्याकडेच होते. अध्यक्षपदी निवड झाल्यावर स्टॅलीन यांनी समर्थकांचे आभार मानले आणि पक्षाचे संस्थापक सी.एन. अण्णादुरई आणि करुणानिधी यांना श्रद्धांजली अपर्ण केली.

2014 मध्ये पक्षातून निष्कासीत करण्यात आलेले स्टॅलीन यांच्या मोठ्या भावाने अलागिरीने त्यांच्यासमोर आव्हान उभे केले होते. आता स्टॅलीन यांची अध्यक्षपदी निवड झाली असली तरी पक्षातील वरिष्ठ नेते आणि निष्ठावंतांना एकत्र ठेवण्याचे आव्हान त्यांना पेलावे लागणार आहे. तसेच अलागिरी यांच्या कारवायांनाही त्यांना सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे स्टॅलीन यांचा राजकीय प्रवास खडतर असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.