‘राज्यपालांना फक्त तोंड आहे, कान नाही’; विधेयकावरून झालेल्या वादात मुख्यमंत्री स्टॅलिन यांचा हल्लाबोल

tamil nadu cm mk stalin governor R. N. Ravi

गैरभाजप राज्यात राज्यपाल आणि सत्ताधारी सरकार यांच्यात सातत्यानं वाद होत राहतात. हे आता तसे नवीन राहिलेले नाही. तमिळनाडूमध्ये देखील तसाच अनुभव आहे. तमिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी गुरुवारी सांगितले की, ‘सर्वसाधारणपणे राज्यपाल जास्त बोलतात आणि कमी ऐकतात’. राज्यपालांनी राज्य सरकारच्या कारभारात ढवळाढवळ करू नये, या सर्वोच्च न्यायालयाच्या निरीक्षणाचे राज्यपालांनी पालन करावे का, या प्रश्नाला स्टॅलिन हे उत्तर देत होते.

‘आतापर्यंत राज्यपालांच्या कृतीतून असे दिसते की त्यांच्याकडे कान नसून फक्त तोंड आहे,’ असे तमिळनाडूचे मुख्यमंत्री त्यांच्या ‘उंगलील ओरुवन’ या आत्मचरित्रावरील कार्यक्रमात म्हणाले.

‘मी यासंदर्भात पंतप्रधान मोदींना पत्र लिहिले आहे. तुम्ही निवडणुकीऐवजी तपास यंत्रणांचा वापर करून विरोधकांवर विजय मिळवण्याचा प्रयत्न करू नका’, असेही ते पुढे म्हणाले.

या कार्यक्रमात बोलताना, तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यात स्थलांतरित कामगारांवर हल्ले होत असल्याच्या खोट्या वृत्तांवरही भाष्य केले.

स्टॅलिन म्हणाले, ‘तमिळनाडूमध्ये अनेक दशकांपासून विविध राज्यांतील लोक राहत आहेत. त्यांना कोणत्याही समस्यांचा सामना करावा लागला नाही. गेल्या काही वर्षांत अनेक जण नोकरीच्या शोधात तमिळनाडूत आले आहेत. त्यांना कोणत्याही समस्यांना सामोरे जावे लागले नाही. परंतु काही बनावट व्हिडीओ वापरून खोटे पसरवले जात आहे.’

स्टॅलिन म्हणाले की, ‘उत्तरेकडील काही भाजप कार्यकर्ते खोटे पसरवत आहेत आणि लोकांना अशा व्हिडीओंमागील अजेंडा समजू शकतो.’

स्टॅलिन म्हणाले, ‘मी राष्ट्रीय स्तरावर विरोधकांच्या एकजुटीसंदर्भात बोलल्याच्या एका दिवसानंतर स्थलांतरितांवरील हल्ल्यांच्या अशा बातम्या आल्या आहेत.’

राज्यात कुठेही स्थलांतरितांवर परिणाम झाला आहे की नाही हे आपण स्वतः तपासले असून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना त्याची खरी माहिती दिल्याचंही ते म्हणाले.

इतकंच नाहीतर बिहारचे अधिकारीही राज्यात आल्यानंतर त्यांनी हे वृत्त खोटे असल्याची पुष्टी केल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. तमिळनाडू हे नेहमीच सुरक्षित आश्रयस्थान म्हणून ओळखले जाते, असा दावाही स्टॅलिन यांनी यावेळी केला.