आमदार बच्चू कडू यांना अटक आणि सशर्त जामीन

58

सामना ऑनलाईन । नाशिक

सरकारी कामामध्ये अडथळा निर्माण केल्याप्रकरणी आमदार बच्चू कडू यांना नाशिकमध्ये अटक करण्यात आली. नाशिकच्या सरकारवाडा पोलीस स्थानकामध्ये बच्चू कडू यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, बच्चू कडू यांना जिल्हा न्यायालयात दाखल करण्यात आले असून, न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. १५ हजाराच्या जातमुचलकावर सुटका करण्यात आली आहे. जोपर्यंत आरोपपत्र दाखल होत नाही तोपर्यंत प्रत्येक शनिवारी पोलीस स्थानकावर हजेरी देण्याची अट कडू यांच्यासमोर ठेवण्यात आली आहे.

आमदार आमदार बच्चू कडू आणि त्यांच्या समर्थकांनी नाशिक महापालिकेत जोरदार गोंधळ घातला होता. अपंग पुनर्वसन कायद्याची अंमलबजावणी झाली नसल्या कारणाने आयुक्त अभिषेक कृष्ण यांना बच्चू कडू आणि समर्थकांनी घेराव घातला होता. या दरम्यान दोघांमध्ये वाद झाल्याने आमदार बच्चू कडू यांनी आयुक्तांवरच हात उगारला होता.

नाशिक महानगरपालिकेने अंपग पुनर्वसन कायदा १९९५ अद्याप पर्यंत अंमलात आणलेला नाही. तसेच अपंगांसाठी राखीव असणारा ३ टक्के निधी आजपर्यंत खर्च केला जात नसल्याने प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मनपा मुख्यालयासमोर आंदोलन केले. आंदोलनाचे नेतृत्त्व करणारे आमदार बच्चू कडू यांनी शिष्टमंडळासह महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या शाब्दिक वादानंतर कडू यांचा संयम सुटला आणि त्यांनी थेट कृष्ण यांच्या अंगावर धावत जात हात उगारला. मात्र शिष्टमंडळाच्या कार्यकर्त्यांनी बच्चू कडू यांना वेळीच रोखले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.

आपली प्रतिक्रिया द्या