दलिताच्या घरी जेवायला गेलेल्या मंत्र्याने हॉटेलमधून जेवण मागवले 

181
सामना ऑनलाईन । लखनौ

दलिताच्या घरी जेवणार अशी जाहिरातबाजी करून दलित कुटुंबाकडे जेवायला गेलेल्या उत्तरप्रदेशमधील भाजप मंत्र्याने चक्क हॉटेलमधून जेवण मागविल्याचे समोर आले आहे. जय प्रताप सिंह असे त्या मंत्र्याचे नाव असून ते योगी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री आहेत. सिंह यांनी शनिवारी त्या गावात राहण्याचे देखील गावकऱ्यांना वचन दिले होते. त्यासाठी गावकऱ्यांनी त्यांच्या राहण्याची सोय देखील केली होती, मात्र सिंह यांनी गावकऱ्यांची फसवणूक करत तेथून काढता पाय घेतला.

जय प्रताप सिंह यांचा अखंडनगर तालुक्यातील बीरपूर आणि प्रतापपूर या दोन गावांचा ते दौरा करणार होते. या दौऱ्याच्या वेळी ते एका दलित कुटुंबाच्या घरी जेवणार होते व त्यानंतर गावातच मुक्काम करून दुसऱ्या दिवशी पुन्हा गावकऱ्यांची भेट घेणार होते. नियोजित वेळेनुसार शनिवारी जय प्रताप सिंह गावात आले. त्यांनी जनतेशी संवाद साधला. त्यानंतर ते रामदयाल या दलित व्यक्तीच्या घरी जेवायला जाणार होते. मात्र सिंह व स्थानिक आमदार राजेश गौतम त्या दलित कुटुंबाच्या घरी जेवायला गेले. त्यावेळी ते पोहोचण्याआधीच त्यांच्यासाठी हॉटेलमधील जेवण आणून ठेवण्यात आले होते. त्यामुळे जनतेसमोर जरी त्यांनी दलित कुटुंबाच्या घरी जेवत असल्याचे दाखवले असले, तरी प्रत्यक्षात मात्र ते हॉटेलमधील जेवण जेवत होते, असे वृत्त एका हिंदी वृत्तपत्राने दिले आहे.

तसेच गावकऱ्यांनी व स्थानिक प्रशासनाने जय प्रताप सिंह यांच्या राहण्याची सोय एका शाळेत केलेली होती. मात्र सिंह यांनी रविवारी गावकऱ्यांना सकाळी परत येण्याचे आश्वासन देत तेथून काढता पाय घेतला. यांच्या या वागणुकीवरून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या