महाविकास आघाडीच्या आमदारांचा हातात गुढी घेऊन मिंधे सरकारला सवाल; उद्योग चालले बाहेर, सरकारा… गुढी घरी उभारू की शेजारी?

मिंधे सरकारच्या काळात प्रचंड वाढलेली महागाई, वाढती बेरोजगारी यामुळे जनता त्रस्त झाली आहे. शेतकरी मरतोय. कष्टकरी कामगार रडतोय. सरकारला मात्र त्याची फिकीर नाही. या झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी महाविकास आघाडीच्या आमदारांनी आज हातात गुढय़ा घेऊन निर्दयी सरकारविरोधात विधिमंडळात जोरदार घोषणा दिल्या.

विधानसभेच्या पायऱ्यावर महाविकास आघाडीच्या आमदारांनी आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पंधराव्या दिवशी सरकारविरोधी घोषणांनी विधान भवनाचा परिसर दुमदुमून सोडला. ‘झोपलेलं सरकार जागं होऊ दे, जनतेचा पाडवा गोड होऊ दे… बळीराजाला मदत करा नाहीतर खुर्च्या खाली करा… ईडा पीडा टळू दे, बळीचे राज्य येऊ दे… वाढवला गॅस, महागाई केवढी, अवकाळी पाऊस, विस्कटली घडी… उद्योग चालले बाहेर, वाढली बेरोजगारी, सरकारा… कशी करू खरेदी, कशी उभारू गुढी?’ अशा घोषणा त्यांनी दिल्या.