रवी राणा यांच्या निवडणूक खर्चाप्रकरणी उच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस

बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी विधानसभा निवडणुकीत निर्धारीत मर्यादेपेक्षा जास्त खर्च केला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर एक याचिका देखील दाखल करण्यात आली आहे. शिवसेनेचे सुनील खराटे व सुनील भालेराव यांनी ही याचिका दाखल केली आहे. या प्रकरणाच्या सुनावणीनंतर न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला नोटीस बजावून चार आठवड्याच्या आत उत्तर देण्यास सांगितले आहे.

आमदारकीची निवडणूक लढवण्यासाठी निवडणूक आयोगाने खर्चाची मर्यादा घालून दिलेली आहे. रवी राणा यांनी विजय मिळवल्यानंतर निवडणूक निरीक्षक समितीने त्यांनी केलेल्या खर्चाचा ताळेबंद तपासला. याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे की आयोगाच्या अधिकाऱ्यांना यावेळी त्यांना दिसून आले की 26 लाख रुपयांची मर्यादा असताना राणा यांनी 41 लाख 88 हजार रुपये खर्च केले होते. राणा यांनी मर्यादेपेक्षा जास्त खर्च केला असल्याने त्यांचा विजय रद्द घोषित करण्यात यावा अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे. या याचिकेची सुनावणी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सुनील चक्रे व अनिल किलोर यांच्यासमोर झाली.

आपली प्रतिक्रिया द्या