प्रकृती अस्वस्थ्यामुळे भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले रुग्णालयात

767

सातारा विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना मंगळवारी रात्री अस्वस्थ वाटू लागल्याने एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अचानक रक्तदाब वाढल्याने शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना प्रतिभा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना बुधवारी सकाळी पुढील तपासणीसाठी मुंबईत नेण्यात आले. शिवेंद्रसिंह राजे यांची प्रकृती सध्या स्थिर असून लवकरच त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार आहे, अशी माहिती श्रीमंत. छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी दिली आहे.

मंगळवारी रात्री साडेदहाच्या आसपास आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना अस्वस्थ वाटू लागले. यानंतर कुटुंबियांनी त्यांना प्रतिभा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळताच त्याचे पाठिराखे आणि हितचितकांनी रुग्णालयाकडे धाव घेतली. रात्रीच्या सुमारास रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी जमा झाली होती. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रकृती अस्वास्थ्याबाबत माहिती मिळताच माजी खासदार उदयनराजे भोसले यांनीही रुग्णालयात धाव घेत त्यांची भेट घेतली.

रुग्णालयात उपचारानंतर बुधवारी सकाळी पुढील तपासणीसाठी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना मुंबईत नेण्यात आले. सलगचे दौरे, आंदोलन आणि घुरगुती कार्यक्रमासाठी झालेल्या प्रवासामुळे त्यांना रक्तदाबाचा त्रास झाल्याची माहिती मिळत आहे. बुधवारी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पत्रनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील रुग्णालयात जावून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. ‘छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची आज मुंबईतील रुग्णालयात भेट घेतली. नेहमीप्रमाणेच त्यांनी हसतमुखपणे गप्पा मारल्या. त्यांच्या प्रकृतीत झपाट्याने सुधारणा झाल्याचे पाहून अतिशय समाधान वाटले’, अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या