पीक विमा काढण्यासाठी मुदत वाढवा; आमदार धस यांची कृषीमंत्र्याकडे मागणी

164

सामना ऑनलाईन । बीड

मान्सून लांबल्याने आणि त्यानंतरही पावसात सातत्य नसल्याने पिकांना जबर फटका बसण्याची शक्यता आहे. पिकांची नुकसानभरपाई मिळावी यासाठी 2019-20 खरीप हंगामासाठी पंतप्रधान पीक विमा योजना लागू करण्यात आली. या योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत 24 जुलैला संपणार आहे. मात्र, तलाठ्याने प्रमाणित केलेल्या ऑनलाईन सातबाऱ्याची अट विमा कंपनीने लागू केली आहे. यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेता पाच दिवसांची आणखी मुदतवाढ मिळावी यासाठी आमदार सुरेश धस यांनी कृषीमंत्री अनिल बोंडे यांच्याकडे मागणी केली आहे. यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील,परिवहन मंत्री दिवाकर रावते,सहकारमंत्री सुभाष देशमुख आदी उपस्थीत होते. कृषीमंत्री बोंडे यांनी तात्काळ संबंधित मंत्रालयीन सचिवाला पीकविमा भरण्यासाठी पाच दिवसांची मुदतवाढ देण्याचे आदेश दिले आहेत. धस यांनी केलेल्या मागणीला यश मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

मान्सूनच्या लहरीपणामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी अद्याप पीक विमा योजनेत नोंदणी केलेली नाही. यामुळे या शेतकऱ्यांना पीक विम्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागात ऑनलाईन सातबारा मिळविण्यासाठी इंटरनेटची सुविधा नसल्याने तसेच एका तलाठ्याकडे 2 पेक्षा अधिक सज्जे असल्याने प्रमाणित सातबारा शोतकऱ्यांना वेळेत मिळाले नाहीत. त्यामुळे अनेक शेतकरी पीकविमा भरण्यासाठी वंचित राहतील त्यामुळे पीकविमा भरण्याची मुदत वाढवून मिळावी अशी मागणी सुरेश धस यांनी केली होती. त्यांची मागणी कृषीमंत्री अनिल बोंडे यांनी मान्य केल्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या