सिंधुदुर्ग जिल्हयात तात्काळ डायलेसीस मशीन उपलब्ध करा – वैभव नाईक

36

सामना प्रतिनिधी । कणकवली

सिंधुदुर्ग जिल्हयातील कणकवली, कुडाळ, मालवण या रूग्णालयांमध्ये तात्काळ वैद्यकिय अधिक्षक नियुक्त करा, वैद्यकिय अधिकाऱ्यांची रिक्त पदे तत्काळ भरा, ग्रामीण रूग्णालयांमध्ये पुरेशी औषधे उपलब्ध करा, सिध्दीविनायक न्यासाकडून मिळालेल्या १ कोटी निधीतून जिल्हयात तात्काळ डायलेसीस मशीन उपलब्ध करा, अशा अनेक मागण्या आमदार वैभव नाईक यांनी केल्या. यावेळी आरोग्यमंत्री दिपक सावंत यांनी सिंधुदुर्गातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याच्या दृष्टीने पाऊले उचलण्याची ग्वाही दिली.

सिंधुदुर्गातील वैद्यकिय अधिकाऱ्यांच्या १३० पदांपैकी केवळ ३० पदे रिक्त असल्याचे उत्तर देण्यात आले आहे. परंतू वस्तूतः जिल्हयात वैद्यकिय अधिकाऱ्यांची ८० पदे रिक्त आहेत. कुडाळ, मालवण ग्रामीण रूग्णालय आणि कणकवली उपजिल्हा रूग्णालयांमध्ये वैद्यकिय अधिक्षक नाहीत. काही डॉक्टर सात-आठ महिन्यांपासून रजेवर आहेत. रजेवर असलेले डॉक्टर हजर असल्याचे शासनाकडून दाखवले जात आहे. अशा डॉक्टरांना शासन बडतर्फ करणार की पर्याय उपलब्ध करणार असा सवाल आमदार नाईक यांनी केला.

ग्रामीण रूग्णालयांमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून औषध खरेदी झालेली नाही. सिध्दिविनायक न्यासामार्फत सिंधुदुर्गात डायलेसीस मशीन उपलब्ध करण्यासाठी १ कोटी रू. दिले आहेत. परंतु आरोग्य खात्याने ते खर्च केलेले नाहीत, याकडेही नाईक यांनी लक्ष वेधले. यावेळी आरोग्यमंत्री दिपक सावंत यांनी शासन गंभीर दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करेल. रजेच्या नावाखाली गेलेले परंतु पुन्हा कामावर हजर न झालेल्या डॉक्टरांना काढून टाकण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाची मान्यता लागते. मात्र निश्चितपणे याबाबत योग्य ती कार्यवाही केली जाईल असे सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या