आपण खातोय 75 टक्के बनावट पनीर, तुमच्या आमच्या जिवाशी खेळ; सरकार हादरले… कारवाई करणार!

महाराष्ट्रात बाजारात विकले जाणारे 70 ते 75 टक्के पनीर हे भेसळ असलेले म्हणजे चीज अॅनालॉगपासून बनलेले असल्याने त्यावर बंदी घालण्याची मागणी आमदार विक्रम पाचपुते यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे आज विधानसभेत केली.

बाजारातील अवघे 25 ते 30 टक्के पनीर शुद्ध दुधापासून तयार केलेले असते. उर्वरित चीज अॅनालॉगपासून बनविलेले असते. यात ‘व्हेजिटेबल फॅट’  किंवा वनस्पती तुपाचा (पाम तेल) वापर केला जातो. असे कृत्रिम पनीर विकण्याकरिता शासनाची परवानगी मिळते. परंतु शुद्ध पनीरच्या नावाखाली याच कृत्रिम पनीरची विक्री करून ग्राहकांची दिशाभूल होते. त्यामुळे याला प्रतिबंध करण्याची मागणी पाचपुते यांनी केली.

त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, ही अतिशय़ गंभीर बाब असल्याचे मान्य केले. हा लोकांच्या जिवाशी खेळ असून तपासणीकरिता प्रयोगशाळा उभारण्यासाठी लागेल तेवढा निधी देण्यात येईल. नियम कडक करण्यात येतील. पेंद्राशी संपर्क साधून पुढील कारवाई करू. या अधिवेशनापूर्वी अन्न व औषध प्रशासन विभाग व लोकप्रतिनिधींची संयुक्त बैठक घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

चीज अॅनालॉग म्हणजे काय

हे हुबेहूब पनीरसारखे पांढरेशुभ्र दिसते. चीज अॅनालॉग पनीरपेक्षा अर्ध्या किमतीत मिळते. या दोन्ही पदार्थांमधील फरक लक्षात येत नसल्याने ग्राहकांची फसवणूक होते. पनीर हे शुद्ध दूध नासवून केले जाते. त्यामुळे दोन लिटर दुधापासून जेमतेम पाव किलो पनीर मिळू शकते. चीज अॅनालॉगमध्ये दुधाची पावडर आणि वनस्पती तेलाचा वापर करण्यात येतो.