‘रॅश ड्रायव्हींग’ करून महिलांना त्रास देणाऱ्या गुंडाची नागपुरात नागरिकांनी केली हत्या

1184

उपराजधानीच्या शांतिनगरातील नालंदा चौकात सोमवारी मध्यरात्री संतप्त नागरिकांनी मिळून कुख्यात गुंडाची लोखंडी रॉड, विटा, चाकूचे वार करून निर्घृण हत्या केली. आशीष नामदेव देशपांडे (32, रा. नालंदा चौक, नागपूर) असे मृत गुंडाचे नाव आहे. वस्तीतील गल्ल्या अरुंद असताना त्याच्या बेदरकार दुचाकी चालविण्याला लोक त्रासले होते. पोलिसांकडे तक्रार करूनही काहीच कारवाई करण्यात येत नसल्याने अखेर नागरिकांनी कायदा हातात घेतला आणि आशीष देशपांडेची हत्या केली. आशीषवर कळमना पोलीस ठाण्यात पाच गुन्हे दाखल असून, शहरातील इतर गुन्ह्यांमध्येही तो सहभागी असल्याची माहिती आहे. पोलिसांनी 12 तासांत पाच आरोपींना अटक करून इतर फरार आरोपींचा शोध सुरू केला आहे. या घटनेमुळे शांतिनगर परिसरात तणावाचे वातावरण आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आशीष देशपांडे नेहमी वस्तीतील लोकांना कारण नसताना त्रास द्यायचा. गल्लीमधील अरुंद ठिकाणीही तो बेदरकारपणे जोरजोराने हॉर्न वाजवून दुचाकी चालवायचा. विशेषत: रस्त्यावर गप्पा मारत बसलेल्या महिलांची छेडछाड करायचा. त्याच्या या वागण्यामुळे नालंदा चौकातील रहिवासी त्रासले होते. सोमवारी रात्रीच्या सुमारास आशीष देशपांडे हा वस्तीतून भरधाव दुचाकी चालवित होता. विनाकारण हॉर्न वाजवित रस्त्यावर बसलेल्या महिलांना त्रास देत होता.

दरम्यान, त्रास असह्य झालेल्या ममता ढोक नामक महिलेने त्याला हटकले. ‘तू एवढ्या वेगात वाहन चालवू नको. रस्त्यावर मुले खेळत आहेत तसेच आम्हाला पण हॉर्नचा त्रास होतो’, अशी समज दिली. आशीषने त्याची दुचाकी थांबवून त्या महिलेला अश्लील शिवीगाळ केली आणि ‘परत आल्यावर तुला दाखवितो’ असे बोलून भरधाव निघून गेला. ही बाब महिलेने वस्तीतील आरोपी युवक निखिल मेश्राम, निखिल हांडा, आशू मेश्राम, आदर्श गोखे, रॉकी मेश्राम यांना सांगितली. या प्रकाराची फिर्याद ममता ढोक यांनी शांतिनगर पोलीस ठाण्यात दिली. तक्रारीची माहिती जेव्हा आशीषला कळली तेव्हा त्याची तळपायाची आग मस्तकात गेली. रात्रीच्या सुमारास तो पुन्हा दुचाकी घेऊन रस्त्यावरून हॉर्न वाजवित भरधाव जात होता. त्याला वस्तीतील नागरिकांनी अडविले आणि समजूत घालण्याचा प्रयत्न सुरू केला, पण आशीषने त्यांना शिवीगाळ सुरू केली. हातात असलेला चाकू दाखवून धमकावू लागला. त्यामुळे चिडलेल्या नागरिकांनी आजूबाजूच्या घरात जाऊन लोखंडी रॉड, काठ्या, चाकू आणि दगडांनी आशीषवर हल्ला केला. त्याला त्यांनी सावरण्याची संधीसुद्धा दिली नाही. या हल्ल्यात आशीषचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

आपली प्रतिक्रिया द्या