अजमेरमध्ये मुंबई पोलिसांवर जमावाचा हल्ला

सामना प्रतिनिधी, मुंबई

देवनार येथे भरलेल्या बकरी मंडीत व्यापाऱ्याचे आठ लाख चोरून एक चोरटा राजस्थानला पळून गेला. त्या चोराचा माग काढत देवनार पोलीसदेखील अजमेर जिह्यात धडकले. पद्धतशीर माहिती काढून पोलीस त्या चोराच्या घरापर्यंतदेखील पोहोचले, पण पोलीस आल्याचे वृत्त गावात पसरताच 80 ते 100 जणांचा जमाव पोलिसांवर चाल करून गेला. लाठ्याकाठ्यांनी पोलिसांवर हल्ला चढवला. सुदैवाने वेळीच पोलिसांनी सावध भूमिका घेऊन तेथून काढता पाय घेतल्यामुळे मोठा अनर्थ टळला, पण या हल्ल्यात दोन पोलीस जखमी झाले.

अजमेरच्या कायड गावचा फोजू मोहम्मद भाहानूर हा व्यापारी गेल्या महिन्यात देवनार येथे भरलेल्या बकरा मंडीत बकऱ्या विकण्यासाठी आला होता. 20 ऑगस्टला मंडीतल्या गर्दीत फोजूचा खिशा कापून 7 लाखांची रोकड तसेच त्याचा मित्र मोहम्मद सईद मोहम्मद युसुफ कुरेशी याच्या खिशातील 1 लाख 10 हजार अशी 8 लाख 10 हजारांची रोकड चोरण्यात आली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच देवनार पोलिसांनी चोराचा शोध सुरू केला. तांत्रिक बाबी सीसीटीव्ही तसेच खबऱ्यांमार्फत माहिती काढल्यानंतर आरोपी हा राजस्थानच्या अजमेर जिह्यातील कुचील गावचा असल्याचे स्पष्ट झाले.

त्यामुळे त्याला पकडण्यासाठी देवनार पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रवीण सूर्यवंशी हे तीन अंमलदारांच्या पथकासह अजमेरला रवाना झाले. पथकाने कुचील गाव गाठून चोराचा देखील शोध घेतला, मात्र मुंबईचे पोलीस गावात आल्याचे कळताच रविवारी साडेबाराच्या सुमारास जवळपास 100 जणांचा जमाव लाठ्याकाठ्या घेऊन पोलिसांवर चाल करून गेला. प्रसंगावधान राखून सूर्यवंशी यांनी स्थानिक पोलिसांना बोलावून स्वतःचा आणि पथकाचा बचाव केला. तरीदेखील दोन अंमलदारांना मारहाण झाल्याने किरकोळ जखमी झाले.

गांधीनगरचे पोलीसही जखमी
ग्रामस्थ हल्ला करायला येत असल्याचे कळताच सूर्यवंशी यांनी गांधीनगर पोलिसांशी संपर्क साधून त्यांना घटनास्थळी बोलावले. त्यानुसार पोलीस घटनास्थळी पोहचले, पण चोराच्या बचावासाठी सरसावलेल्या ग्रामस्थांनी स्थानिक पोलिसांना ही सोडले नाही. देवनार पोलिसांपेक्षा तेथील पोलिसांना जास्त मारहाण झाली. कुचील गावात जास्त करून गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक राहतात म्हणून एकमेकांच्या बचावासाठी ते अशाप्रकारे पोलिसांवर तुटून पडतात असे सूत्राकडून सांगण्यात आले.

summary- mob lynching attempt on mumbai police at ajmer

आपली प्रतिक्रिया द्या