६ फेब्रुवारी, मोबाइल नंबर आधारला जोडण्याची डेडलाईन

20

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

मोबाइल नंबर आधारला जोडण्यासाठी मोदी सरकारने ६ फेब्रुवारी २०१८ ची डेडलाईन निश्चित केली आहे. मुदत संपेपर्यंत मोबाइल नंबर आधारला जोडला नाही तर संबंधित नंबर डेड अर्थात बंद होणार आहे. बँकेचे खाते आधारला जोडण्यासाठी सरकारने ३१ मार्च २०१८ ची डेडलाईन निश्चित केली आहे. मोदी सरकारने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करुन ही माहिती दिली आहे. सरकारच्यावतीने अॅडव्होकेट जोहेब हुसैन यांनी ११३ पानांचे प्रतिज्ञापत्र सादर केले.

प्रत्येक मोबाइल धारकाला तसेच बँकेच्या खातेधारकाला फॉर्म भरुन स्वतःची माहिती देणे आणि आपला मोबाइल नंबर, बँक खाते आधारला जोडणे बंधनकारक असल्याची भूमिका मोदी सरकारने घेतली आहे. नवे बँक खाते अथवा नवा मोबाइल नंबर घेताना आधारशी जोडण्याचे बंधन घातल्याचेही सरकारने स्पष्ट केले.

सरकारी योजना आणि आधार एकमेकांशी जोडल्यामुळेच देशात अन्नाविना एकही मृत्यू झाला नसल्याचे सरकारच्यावतीने सांगण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाच्या दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाने मोबाइल नंबर आधारला जोडण्यासंदर्भात सरकारला आपली भूमिका जाहीर करण्यासाठी चार आठवड्यांची मुदत दिली होती. याआधी सर्वोच्च न्यायालयाच्या संविधानपीठाने आधारची सक्ती हे खासगी जीवनात हस्तक्षेप करण्यासारखे आहे, असे सांगितले होते. मात्र सरकारने आधार संदर्भातल्या आपल्या सक्तीच्या धोरणात बदल केलेला नाही.

फंडांनाही आधारजोडणी

बँकेच्या खात्यासाठी, सर्वप्रकारच्या अनुदानांचा लाभ घेण्यासाठी, जन्म-मृत्यूच्या दाखल्यांसाठी केंद्र सरकारने आधार कार्ड बंधनकारक केल्यानंतर आता गुंतवणुकीसाठीही आधार कार्ड सक्तीचे करण्यात आले आहे. येत्या एक जानेवारीपासून म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आधार कार्डचे तपशील द्यावे लागणार आहेत. जे आधीपासून म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करत आहेत त्यांना ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत आधार कार्डचे तपशील द्यावे लागणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या