काय हा अमानुषपणा?

62

नवरा पत्नीवर सपासप वार करीत होता आजूबाजूला असलेले अनेक हात या घटनेचे मोबाईलवरून चित्रीकरण करीत होते. काय हा अमानुषपणा? अत्याचार होत असताना बघ्याची भूमिका घेणारे लोकच समाजाच्या नाशाला कारणीभूत ठरतात. पिंपरीतील त्या पीडित मुलीच्या जागी तुमची मुलगी किंवा बहीण असती तर तुम्ही बघ्याची भूमिका घेतली असती काय? या प्रश्नाचे उत्तरमोबाईलवीरांनी द्यावे. यापुढे अशा घटनांचे मोबाईल चित्रण करणाऱ्यांवर कायद्याने कारवाई व्हावी!

विज्ञान व तंत्रज्ञानाच्या प्रगतीने माणुसकीचा मुडदा पडला आहे काय? असे आता वाटू लागले आहे. अगदी अलीकडील काळापर्यंत जेव्हा एखादा अपघात घडत असे तेव्हा मदतीसाठी आसपासचे असंख्य हात पुढे होत असत. माणुसकीचे दर्शन तेव्हा घडत असे. आता तुमच्या त्या मोबाईल नामक छोटय़ा डबीने माणुसकी आणि संवेदना मारली आहे. तशा घटनाच वारंवार घडताना दिसत आहेत. पिंपरीतील एका घटनेने आमची चिंता वाढवली आहे. फरहाना फिरोज शेख नावाची महिला पिंपरीत राहते. तिचा नवरा फिरोज अली शेख. नवरा-बायकोचे भांडण झाले. भांडणाचे कारण जे काही असायचे ते असेल. नवऱ्याने तिला स्वतःच्या गाडीत घालून मोशी प्राधिकरणाच्या मोकळय़ा मैदानात नेले. कारमधून उतरवून फरहानला मारण्यास सुरुवात केली. तो चाकूने तिच्यावर सपासप वार करू लागला. ती अबला किंचाळत होती, मदतीसाठी आक्रोश करीत होती; पण तेथे असलेला एकही मायका लाल तातडीने तिच्या मदतीस गेला नाही. उलट या घटनेचे मोबाईल चित्रीकरण करण्यात बरेचजण गुंग झाले होते. नवरा पत्नीवर सपासप वार करीत होता व आजूबाजूला असलेले अनेक हात या घटनेचे मोबाईलवरून चित्रीकरण करीत होते. काय हा अमानुषपणा? फरहानाचे नशीब चांगले की, घटनास्थळी पोलीसही आले आणि उशिरा का होईना, बघ्यांतील काही जणांनी तिच्या नवऱ्याला अडवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तिचा जीव वाचला. मात्र ज्यांनी मोबाईलवरून या घटनेचे चित्रीकरण करण्यात आनंद मानला त्यांचे हात

बांगड्याभरण्याच्याही लायकीचे

नाहीत. एवढेच नव्हे तर रक्षाबंधनाच्या राख्या मनगटावर बांधून त्यांनी स्वतःला तोऱ्यात मिरवू नये. जात, धर्म बाजूला ठेवा, पण एक अबला आक्रोश करीत असताना तिला वाचविण्याचे सोडून डोळय़ांवर कातडी ओढणाऱ्यांकडून या देशाचे काय रक्षण होणार? अशा घटना पुणे-मुंबईतच नव्हे, तर देशात सर्वत्र वारंवार घडत आहेत. दिल्लीमध्ये भरचौकात एका तरुणीवर तिच्या प्रियकरानेच चाकूचे वार करून ठार मारले. तेव्हाही तेथे बघ्यांचीच गर्दी होती व त्यातील अनेकजण मोबाईलवरून त्या घटनेचे चित्रीकरण करण्याची ‘मर्दानगी’ दाखवीत होते. गेल्याच महिन्यात मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील भोकर येथेदेखील असाच दुर्दैवी प्रकार घडला. ‘ऑनर किलिंग’चा बळी ठरलेल्या एका तरुणीचे प्राण बघ्यांच्या नामर्दानगीमुळे वाचू शकले नाहीत. या तरुणीने दुसऱ्या जातीच्या मुलाशी लग्न केले म्हणून सख्या भावानेच बहीण आणि मेव्हण्याचा वाटेत चाकूने निर्घृण खून केला. जखमी तरुणी काही काळ रस्त्यावर बसून होती, पण आजूबाजूच्या बघ्यांनी केवळ मोबाईलवरून चित्रीकरण करण्यात धन्यता मानली. त्याऐवजी त्या दुर्दैवी तरुणीला तातडीने उपचार मिळतील असे पाहिले असते तर कदाचित तिचा जीव वाचला असता. कोकणातील आंबोली घाटात दारूच्या नशेत दुस्साहस करणाऱ्या दोघा तरुणांचे जीवदेखील असेच हकनाक गेले. मोबाईलवरून त्यांचे चित्रीकरण करणाऱ्या लोकांनी वेळीच अटकाव केला असता तर ते दोघेही वाचले असते. हल्ली हे असे एखाद्याच्या मृत्यूचे, अपघातात जखमी होऊन

तडफडणाऱ्या व्यक्तीचे

मोबाईलवरून ‘जिवंत’ चित्रीकरण करण्याचे विकृत फॅड भलतेच फोफावले आहे. अगदी कुत्र्याला गच्चीवरून फेकण्याच्या नराधम कृतीचा व्हिडीओ आपल्या देशात काही महिन्यांपूर्वी व्हायरल झालाच होता. अशी नामर्दानगी व माणुसकीहीनता हासुद्धा एकप्रकारे अतिरेक किंवा दहशतवादच आहे. शिवाजी महाराज जन्मास यावेत पण शेजाऱ्यांच्या घरात, या मानसिकतेत असलेल्या समाजाकडून काय अपेक्षा ठेवायची? ‘सेल्फी’ काढण्याच्या नादात रोज तरुण-तरुणींचे बळी जात आहेत. कुणी समुद्रात पडतोय, कुणी उंच इमारतीवरून तर कुणी कड्यावरून दरीत कोसळतोय. मरण्याची इतकीच हौस असेल तर सैन्यात भरती होऊन हौतात्म्य पत्करा! पाकिस्तान व चीनचे आक्रमण होते तेव्हा युद्ध कसे करावे व दुश्मनास कसे मारावे यावर प्रवचने झोडणारे हेच लोक असतात. पण प्रसंग बाका असतो तेव्हा तुम्ही काय करता? हातात बंदुका घेऊन युद्धावर जाऊ नका, पण निदान आजूबाजूला घडणाऱ्या पिंपरीसारख्या अमानुष घटना तरी रोखण्याचा प्रयत्न करा. अबलांवर बलात्कार होतात, अत्याचार होतात असे नुसते बोलून उपयोगाचे नाही. अत्याचार होत असताना मुक्याची व बघ्याची भूमिका घेणारे लोकच समाजाच्या नाशाला कारणीभूत ठरतात. अशाच लोकांमुळे देशाला गुलामीच्या बेड्या पडत असतात. पिंपरीतील त्या पीडित मुलीच्या जागी तुमची मुलगी किंवा बहीण असती तर तुम्ही अशीच बघ्याची भूमिका घेतली असती काय? या प्रश्नाचे उत्तर ‘मोबाईलवीरां’नी द्यावे. यापुढे अशा घटनांचे मोबाईल चित्रण करणाऱ्यांवर कायद्याने कारवाई व्हावी!

आपली प्रतिक्रिया द्या