ऍप्स बंदीनंतर मोबाईल विक्री हँग, बाजारपेठेवर होणार परिणाम

4860

हिंदुस्थानने काही दिवसांपूर्वीच टिकटॉक, शेअरइट, हॅलो यासारख्या 59 चिनी ऍप्सवर बंदी घातली आहे. देशाच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. लडाखच्या सीमेवर चीनकडून होणाऱया कुरापती अजूनही चालूच आहेत. त्याशिवाय जगभरात चीनमधून पसरलेला कोरोना हा व्हायरस या सगळ्याचा परिणाम म्हणून सरकारने ऍप्सवर बंदी घालण्याचे पाऊल तर उचलले. मात्र आता या सगळ्याचा परिणाम हिंदुस्थानी बाजारपेठांवरही तितकाच होणार आहे. चीनला हिंदुस्थानने घेतलेला हा निर्णय नक्कीच झोंबला असून आता हिंदुस्थानच्या बाजारपेठांवरही त्याचा नक्कीच परिणाम दिसून येईल. ऍप्स बनविणाऱया कंपनीजसाठी हिंदुस्थानी बाजारपेठ ही नक्कीच मोठी होती. टिकटॉक वापरणाऱया युजर्सची संख्या ही सुमारे बारा कोटी होती तर हॅलो ऍप वापरणाऱयांची संख्या ही साधारण 50 कोटीच्या आसपास आहे. त्यामुळे त्याचा सरळ सरळ परिणाम या कंपनीजवर होणार हे नक्की आणि त्यामुळेच हिंदुस्थानने चीनला मात देण्यासाठी केवळ सीमेवरूनच नाही तर अर्थव्यवस्थेतही लढा द्यायचे ठरवले असल्याचे दिसून येत आहे. केवळ ऍप्सच नाहीत तर अन्य चीनी वस्तूंच्या बंदींमुळे बराच परिणाम होणार आहे.

मालाची ने-आण करण्यावर होणारा परिणाम
सध्या सीमेवरून दोन्ही देशांमधील तणाव वाढतच चालला आहे. अशामध्ये चीनमधून आयात करणाऱया आणि गुंतवणूक स्वीकारणाऱया कंपनीज आता तातडीने दुसरा पर्याय शोधणे आवश्यक आहे. त्यामध्ये घरगुती उपकरणे, लगेच बॅग्ज, वाहनांचे भाग तयार करणाऱया कंपनीज अथवा ई – कॉमर्स कंपनीज या सगळ्यांनाच आता नव्याने आपल्या उद्योगांकडे पाहावे लागेल आणि पुन्हा नव्याने योजना आखाव्या लागतील. मोठमोठय़ा कंपनीज वाहनांचे सुटे भाग आणि इलेक्ट्रॉनिक्स चीनमधून मागवतात. पण आता चिनी वस्तूंवरील बहिष्कारामुळे यावरही त्याचा परिणाम होतोय.

मोबाईल विक्रीवर होणार सर्वात जास्त परिणाम
चिनी मोबाईल कंपनीजचे मोबाईल वापरण्यासाठी उत्कृष्ट आणि चांगले असल्यामुळे जगभरात या मोबाईल्सना मागणी होती. मात्र आता कोरोनाच्या पार्श्वभूमीनंतर चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे सत्र वाढतच चालले आहे. अनेकांनी आपले रेडमी, विवोसारखे मोबाईलदेखील वापरणे बंद केले आहे. पण आता या सगळ्याचा परिणाम म्हणजे चिनी मोबाईलची विक्री हिंदुस्थानमध्ये अत्यंत कमी झाली आहे. तर स्वदेशीचा वापर जास्त प्रमाणात वाढू लागला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या