स्वस्तात मस्त पैसे झाले फस्त

30

कोलकाता – बाजारभावापेक्षा कमी किमतीत वस्तू हव्या असतील तर ऑनलाइन शॉपिंग करायची हा सध्याचा ट्रेंड आहे. अनेक ऑनलाइन शॉपिंगच्या बेवसाईट असून एकापेक्षा एक स्कीम आणि अधिकाधिक सूट या वेबसाइटवर मिळत असते. सूट देण्यासाठी ऑनलाइन कंपन्यांमध्ये स्पर्धा सुरू असते. स्वस्तात मस्त वस्तू मिळत असल्याने ऑनलाइन शॉपिंगचा मोह कुणाला आवरत नाही. मात्र हाच मोह एकाला महागात पडला आणि स्वस्त आयफोनच्या नादात त्याचे तब्बल ३४ हजार रुपये फस्त झाले.

आयफोन ६ एस हा ६४ जीबीचा मोबाईल ४० हजार रुपयांना मिळत असल्याची जाहिरात मुंबईतील अक्षय अवसारे या तरुणाने पाहिली. त्याने जाहिरातीमधील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला. सभ्यसाची मिस्त्र असे आपले नाव असल्याचे मोबाईलवर बोलणाऱयाने सांगितले. अक्षयने हा मोबाईल खरेदी करायचा असल्याचे सांगितले. मिस्त्र याने रक्कम भरण्यासाठी इंडीयन बँकेच्या कोलकाता येथील शाखेतील खात्याचा तपशील दिला. बँक खाते दिल्यामुळे अक्षयचाही त्यावर विश्वास बसला. त्याने एनएफटीद्वारे या खात्यामध्ये ३४ हजार रुपये भरले. ३४ हजार रुपये भरल्याचे समजल्यानंतर मिस्त्र याने एक पार्सल अक्षयच्या घरी पाठविले. आयफोन आल्यामुळे अक्षय खुशीत होता मात्र पार्सल खोलले त्यावेळी त्यामध्ये फक्त कागद भरलेले होते. यानंतर अक्षय याने मिस्त्र याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा मोबाईल बंद होता. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अक्षय याने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार केली.

सायबर पोलिसांनी कोलकात्यामधील इंडीयन बँकच्या माणिक कोटला शाखेशी संपर्क साधला. पोलीस त्या ठिकाणी पोहचले. मात्र हे बँक खाते खोटय़ा माहितीच्या आधारे उघडण्यात आल्याचे समोर आले. पोलिसांनी याच परिसरावर लक्ष केंद्रित केले. तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी मिस्त्र याला शोधून काढले. त्याच्या घराची झडती घेतली त्यावेळी विविध बँकांची डेबिट कार्ड, सीम कार्ड, मोबाईल तसेच इतर बनावट कागदपत्रे जप्त केली. त्याने अशा प्रकारे अनेकांना चुना लावल्याचे उघड झाले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या