सराईत सोनसाखळी टोळीविरुद्ध मोक्का कारवाई, तब्बल 20 सोनसाखळी चोरीचे गुन्हे, सराफही गोत्यात

शहरातील विविध भागांतून दुचाकीची चोरी करून सोनसाखळी हिसकाविणाऱ्या सराईत टोळीविरुद्ध मोक्कानुसार कारवाई करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या युनिट पाचने या टोळीचा पर्दाफाश केला आहे. दीपक परशुराम माळी (22, रा. केशवनगर, मुंढवा) आणि मुकेश सुनील साळुंखे (19, रा. मुंढवा) आणि चोरीचे सोने घेणारा सराफ सम्राट हुकुमसिंग भाटी यांच्याविरुद्ध मोक्का कारवाई करण्यात आली आहे.

सोनसाखळी चोरणारे सराईत चोरटे हडपसर परिसरात थांबल्याची माहिती पोलीस अंमलदार अजय गायकवाड आणि चेतन चव्हाण यांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून सराईत दीपक आणि मुकेशला ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी तब्बल 20 ठिकाणांहून सोनसाखळी चोरल्याची कबुली दिली. सराईत दीपक माळी याने टोळी तयार करून ठिकठिकाणी सोनसाखळी चोरीचे गुन्हे केले होते. त्यानंतर सोने सराफ भाटी याला विकले होते.

त्यानुसार त्यांच्याविरुद्ध मोक्कानुसार कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी आयुक्तांकडे पाठविला होता. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी प्रस्तावाला मंजुरी दिली. ही कामगिरी पोलीस अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, डीसीपी श्रीनिवास घाडगे, एसीपी लक्ष्मण बोराटे, पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय संतोष तासगावकर, रमेश साबळे, आश्रुबा मोराळे, दया शेगर, दत्ता ठोंबरे, दीपक लांडगे, प्रमोद टिळेकर, विनोद शिवले, विशाल भिलारे, अमर उगले, स्वाती गावडे, स्नेहल जाधव, संजयकुमार दळवी यांच्या पथकाने केली.

आपली प्रतिक्रिया द्या