हिंदू असल्याचे सांगून मॉडेलला फसवले, धर्मांतरास नकार दिल्याने खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी

हिंदू असल्याचे सांगून एका मॉडेलिंग कंपनीच्या मालकाने मॉडेलला फसवल्याचे समोर आले आहे. मानवी असे त्या मॉडेलचे नाव असून तिने मॉडेलिंग कंपनीचा मालक तनवीर खान याच्यावर लव्ह जिहादचा आरोप केला आहे. या प्रकरणी तिने व्हर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार केली असून त्यांनी हे प्रकरणी रांची पोलिसांकडे वर्ग केले आहे.

मूळची बिहारची असलेल्या मानवीने रांची येथील एका मॉडेलिंग कंपनीत नाव नोंदवले होते. तिथे नवोदित मॉडेल्सला ग्रुमिंग केले जाते. या कंपनीचा मालक तनवीर खान याने मानवीसोबत मैत्री करण्यासाठी तिला त्याचे नाव यश सांगितले होते. त्या दोघांमध्ये चांगली मैत्रीही झाली होती. काही दिवसांनी तनवीरने मानवीला प्रपोज केले व त्याचे खरे नाव सांगितले. ते ऐकून मानवीला धक्का बसला. तिने तत्काळ तनवीरसोबत बोलणं बंद केलं. मात्र तनवीरने तिला लग्नासाठी व धर्मपरिवर्तनासाठी जबरदस्ती करण्यास सुरुवात केली.

दरम्यान एका होळीच्या कार्यक्रमात तनवीरने मानवीच्या ड्रिंकमध्ये काहीतरी मिसळून तिला बेशुद्ध केले होते व त्या अवस्थेत तिचे आक्षेपार्ह फोटो काढले होते. ते फोटो वापरून तनवीर तिला ब्लॅकमेल करू लागला. त्यामुळे मानवी रांची सोडून मुंबईत आली. मात्र त्याचे ब्लॅकमेलिंग थांबत नसल्याने मानवीने अखेर वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तसेच मानवीने याबाबतचा एक व्हिडीओही तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे.

तक्रार दाखल झाल्यानंतर तनवीरने मानवीवरच आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप केला आहे. ” मानवी माझ्याकडे काम करायची. तिच्या मुळे मला व्यवसायात खूप नुकसान झालेले. त्यामुळे मी तिच्याकडे नुकसान भरपाई मागत होतो. त्यामुळे तिने मला या खोट्या केसमध्ये फसवले आहे. माझे काही प्रायव्हेट फोटोही तिच्याकडे आहेत.” असा आरोप तनवीरने केला आहे.