रॉयल क्लबला पराभूत करून मॉडर्न क्रिकेट क्लब अंतिम फेरीत; यश कदमचा प्रभावी मारा, प्रणव, शुभम यांची अर्धशतके

13

सामना ऑनलाईन । ठाणे

ठाण्याच्या सेंट्रल मैदानावर सुरू असलेल्या श्यामराव ठोसर ढाल क्रिकेट स्पर्धेत कल्याणच्या मॉडर्न क्रिकेट अकादमीने ठाण्याच्या रॉयल क्रिकेट क्लबला ६ गडी राखून पराभूत करीत दिमाखात अंतिम फेरीत मजल मारली. सुमारे ५० वर्षांनंतर प्रथमच मॉडर्न क्लबने ठाण्याच्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत अंतिम फेरी गाठण्याचा पराक्रम केला आहे.

उपांत्य लढतीत प्रथम फलंदाजीस उतरलेल्या रॉयल क्रिकेट क्लबने ४२.१ षटकांत सर्व बाद १७५ अशी मजल मारली ती सौरभ जोशी (४२), समीर खान (३२) व मंदार गरुड (३४) यांच्या दमदार फलंदाजीच्या बळावर. मॉडर्नच्या यश कदमने २४ धावांत ३, तर श्रेयस हडकरने ३२ धावांत २ फलंदाज बाद केले. विजयासाठीचे १७५ धावांचे आव्हान मॉडर्न क्रिकेट क्लबने ३२.२ षटकांत केवळ ४ गडी गमावून पार केले. त्यांनी ४ बाद १७९ ही विजयी धावसंख्या उभारली. मॉडर्नच्या विजयात प्रणव धनावडे (५०), शुभम पुण्यार्थी (७६) व ओम जाधव (नाबाद ३९) यांनी सिंहाचा वाटा उचलला. रॉयलच्या इरफान कोंडीलकरने २९ धावांच्या मोबदल्यात ३ फलंदाजांना बाद केले.

आपली प्रतिक्रिया द्या