नव्या वर्षानिमित्त मराठमोळे पदार्थ नव्या ढंगात

373

देश विदेशी – शेफ मिलिंद सोवनी

चवही नवी..

गुढीपाडवा म्हटलं की मराठी रेसिपीज… पण नेहमी तेच तेच श्रीखंड-पुरी आणि तेच महाराष्ट्रीय पदार्थ का खायचे? मराठी माणसांनाही त्याचा आता कंटाळा आला असेल. मग महाराष्ट्रीयन पदार्थ करायचे पण ते नवीन वर्षात नवीन पद्धतीने करायचे… असं ठरवलं आणि यावेळी जरा वेगळ्या आणि फ्युजनच्या रेसिपीज देण्याचा प्रयत्न करतोय. महाराष्ट्रीयन डिशेज परदेशी पद्धतीने बनवायच्या हा त्यामागचा प्रमुख उद्देश्य…

आजच्या जनरेशनला म्हणजे लहान मुलांना सर्वात जास्त आवडतं ते चीज… म्हणून याच चीजचा वापर या रेसिपींमध्ये केला आहे. नेहमी बनवणाऱ्या मराठी रेसिपीज हल्लीचे जनरेशन खात नाहीत. थालीपीठ, अळूची भाजी या अस्सल मराठमोळ्या पदार्थांना लहान मुले हात लावत नाहीत. यामुळे मराठी पदार्थ हळूहळू लुप्त व्हायला लागतील. म्हणून मग आपले महाराष्ट्रीयन पदार्थच पण ते जरा वेगळ्या पद्धतीने त्यांच्यासमोर सादर केले तर त्यांना ते नक्की आवडेल. याच भावनेतून गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर या नव्या मराठी रेसिपीज मी दिल्या आहेत.

या रेसिपींमध्ये एक ‘हेल्दी थालीपीठ पिझ्झा’ दिलीय… हेल्दी अशासाठी केलंय की थालीपीठ आधीच टेस्टी आणि हेल्दी असतं. त्यात वेगवेगळ्या पाच प्रकारची धान्ये असतात. अशाच पिठापासून केलेलं पण त्यावर टॉपिंग पिझ्झासारखं केलंय. म्हणजेच पिझ्झात आपण टोमॅटो किंवा बाकीच्या भाज्या वापरतो त्या यात असतात. त्याऐवजी येथे मोड आलेली कडधान्ये वापरली आहेत. त्यावरून मग चीज सॉस आणि चीज टाकून ते बेक केलंय… त्यामुळे तो थालीपीठासारखा चविष्ट तर लागतोच, पण दिसायला पिझ्झासारखा दिसणार आहे. अशाच प्रकारच्या तीनही डिझेश दिल्या आहेत. हे पूर्णपणे महाराष्ट्रीयन पदार्थ आहेत, पण तरुण पिढीला आवडावेत यासाठी त्यांना मॉडर्न पद्धतीची ट्रिटमेंट दिली आहे. यामुळे मराठी खाद्यसंस्कृतीही जिवंत राहील.

हेल्दी थालीपीठ पिझ्झा

thalipeeth-pizza

साहित्य- १ कप थालीपीठ भाजणी (खास थालीपिठासाठी पीठ बाजारात मिळते), १ मध्यम आकाराचा चिरलेला कांदा, २ चमचे लाल मिरची पावडर, १ चमचा मीठ, पाव चमचा हळद. (सारणासाठी) १ कप मोड आलेले मूग, अर्धा कप लाल आणि हिरव्या भोपळी मिरचीचे काप, अर्धा कप कांद्याचे काप, अर्धा कप चीज.

कृती- थालीपिठाच्या भाजणीत चिरलेला कांदा, मीठ आणि हळद पावडर घालून मिश्रण एकजीव करायचे. ते मऊसर होण्यासाठी त्यात थोडे पाणी घाला. मग नॉनस्टीक तव्यावर थोडे तेल पसरायचे. मग या मिश्रणाचे गोळे करून ते बोटाने दाबून सपाट करून घ्यायचे. मग तव्यावर हे थालीपीठ दोन्ही बाजूने गुलाबी होईपर्यंत भाजा. नंतर तव्यावरून ते खाली काढून घ्यायचे आणि त्यावर कांद्याच्या, हिरव्या-लाल भोपळी मिरचीचे काप आणि मोड आलेले मूग पसरायचे. त्यानंतर त्यावर किसलेले चीज घाला. त्यानंतर हे सर्व ओव्हनमधून चीज वितळेपर्यंत बेक करून घ्या. शेवटी हे थालीपीठ बाहेर काढून पिझ्झासारखे कापून वाढायचे.

आम्रखंड

amrakhand-1

साहित्य- अर्धा किलो ग्रिक दही किंवा चक्का, पाऊण ते एक कप आंब्याचा रस (कॅनमधील मँगो पल्प वापरला तरी चालेल), १ कप साखर, अर्धा चमचा वेलची पावडर, दोन चमचे चारोळ्या, २ चमचे पिस्ता (जाडसर पूड किंवा पातळ काप).

कृती- सर्वप्रथम ग्रिक दही सुती कपडय़ात बांधून ८ते १० तास त्यातील पाण्याचा अंश जाईस्तोवर लटकवून ठेवा. खाली एखादे पसरट भांडे ठेवले तर गळलेले पाणी त्यात जमा होईल. तयार चक्का मोठय़ा भांडय़ात घ्यायचे. त्यात अर्धा कप आंब्याचा रस आणि अर्धा कप साखर घाला. मिश्रण एकजीव करून १५ मिनिटे साखर विरघळण्यासाठी तसेच ठेवून द्यायचे. परत चमच्याने घोटून चव पाहा. गोडपणा आणखी हवा असेल तर आणखी आंब्याचा रस आणि साखर घाला. नंतर पुरणयंत्रातून हे मिश्रण फिरवून घ्या. मग यात वेलची पूड, चारोळी, पिस्ता घालून मिक्स करा. फ्रिजमध्ये थंड करण्यास ठेवा आणि पुऱयांबरोबर वाढा.

मसाला चीज साबुदाणा वडा

sabudana-vada

साहित्य- १ कप साबुदाणा, ४ मध्यम बटाटे, अर्धा कप शेंगदाण्याचा कूट, १ चमचा जिरे, १-२ कापलेल्या हिरव्या मिरच्या, अर्धा कप कापलेली कोथिंबीर, दीड चमचा साखर, मीठ चवीपुरते, तळण्यासाठी तेल. (सारणासाठी) अर्धा कप फेटलेले चीज, १ कापलेली हिरवी मिरची.

कृती- रात्री काही मिनिटे साबुदाणे पाण्यात घालून ठेवायचे. मग ते बाहेर काढून रात्रभर ठेवायचे. यामुळे ते मऊ होतील. सकाळी आधी बटाटे उकडून घ्यायचे. साले काढून त्यांचा लगदा करायचा. या मिश्रणात साबुदाणे मिसळायचे. मग त्यात शेंगदाण्याचा कूट, मीठ, साखर, हिरव्या मिरच्या, कापलेली कोथिंबीर घालून मिश्रण नीट ढवळून घ्या. आता मिश्रणातील काही भाग हातात घेऊन त्याला वडय़ासारखा आकार द्या. त्यात चीज आणि मिरचीचे सारण भरा. हे साबुदाणा वडे लालसर होईपर्यंत तळून घ्या. हिरव्या मिरच्यांच्या चटणीबरोबर छान लागतात.

आपली प्रतिक्रिया द्या