आधुनिक ‘हिरकणी’

65

मीनल सतीश सरकाळे

 

विधात्याच्या नवनिर्माणाची कलाकृती तू

विश्वाची जननी तू, देशाचा आधार तू ।।

तुझ्या अस्तित्वाने दे, देशाला संदेश नवा

कर्तृत्वाचा मुकुट तुझ्या मस्तकी

असायलाच हवा ।।

स्त्री ही त्याग, नम्रता, श्रद्धा, सुजाणपणा व सहनशीलतेची मूर्ती आहे. आज ती कोणत्याच बाबतीत कमी नाही. पारंपरिकरीत्या पुरुष वर्गाची मक्तेदारी असलेली क्षेत्रे ती आज काबीज करीत आहे. पुरुषप्रधान संस्कृतीतही आज पूजा केली जाते ती स्त्रीशक्तीची!

देशाच्या पहिल्या पंतप्रधान इंदिरा गांधी, पहिल्या मुख्यमंत्री सुचेता कृपलानी, पोलीस सेवेतील पहिल्या अधिकारी किरण बेदी, शांततेचा नोबेल पुरस्कारप्राप्त मदर तेरेसा, गानसम्राज्ञी लता मंगेशकर अशा  अनेक मान्यवर स्त्रीयांची नामावली पाहावयास मिळेल. ८ मार्चच्या निमित्ताने आपण आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करतो. स्त्री शिक्षणाचा प्रसार, स्त्रीयांना समानता, समान न्याय, मुलींना कायद्याने संपत्तीत समान अधिकार मिळेल. लग्नासाठी वर पसंत करताना तिच्या मतालाही प्राधान्य दिले जात आहे. उच्च शिक्षणासाठी मुली लहान-लहान शहरांतून मोठ्या शहरांमध्ये  येऊन राहू लागल्या आहेत. नोकरी करणे, आपली ओळख निर्माण करणे यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढीस लागला आहे.

हिंदुस्थानी तत्त्वज्ञानानुसार अस्तित्वाच्या त्रिकोणाचा पाया म्हणजे संरक्षण, दुसरी बाजू म्हणजे शक्ती देणारी महाकाली दुर्गा अन् तिसरी बाजू म्हणजे ज्ञान देणारी महासरस्वती! अशा प्रकारे तीन शक्ती महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती या स्त्र्ााrशक्तीमध्ये सामावलेल्या असतात. आजपर्यंत स्त्री ही आर्थिकदृष्टय़ा परावलंबी होती. शिक्षणापासून वंचित होती. सत्तेत किंवा अधिकारात पुरुष आपल्या मसल पॉवरच्या बळावर प्रभुत्व दाखवत होता. तिला यात थारा नव्हता. त्यामुळे चूल आणि मूल एवढेच आपले क्षेत्र आहे अशी तिची मानसिकता बनली होती. पुढे सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचा पाया घातला अन् आज ती स्त्री शिक्षण घेऊन आर्थिकदृष्टय़ा सबळ बनली, स्वावलंबी झाली. सत्तेत, अधिकारात तिला वाव मिळू लागला. पर्यायाने तिचे सक्षमीकरण होऊ लागले. बदलत्या समाज आणि परिस्थितीनुसार आज स्त्रीची व्याख्या बदलत गेली. ती आज अबला नाही तर सबला बनली आहे.

मुंबई येथे पहिला महिला दिवस ८ मार्च १९४३ रोजी साजरा झाला. पुढे १९७५ हे वर्ष युनोने जागतिक महिला वर्ष जाहीर केले. ८ मार्चला बऱ्याच ठिकाणी महिलाप्रधान कार्यक्रम घेऊन, काही थोर कर्तृत्ववान महिलांना आठवून तर काहींचा सत्कार करून हा दिवस साजरा केला जातो, पण हे सर्व एकाच दिवसापुरते मर्यादित!  ९ मार्च उजाडला की, पुन्हा जैसे थे!

आज हिंदुस्थानातील सर्वोच्च पदावर महिला विराजमान आहेत. जगात सर्वाधिक महिला अभियंत्या हिंदुस्थानात आहेत. उच्चशिक्षित पदावर काम करणाऱया महिलांची संख्या सर्वाधिक हिंदुस्थानात आहे. त्यासाठी महिला सक्षमीकरणाची गरज आहे आणि त्याची सुरुवात घरापासूनच झाली पाहिजे.

स्त्रीची प्रतिष्ठा फक्त वीरपत्नी अथवा वीरमाता होण्यात नाही तर वीर स्त्री होण्यात आहे. आधुनिक जगातील या व अशा कैक असंख्य हिरकणी आयुष्याचा पर्वत जिद्द आणि संघर्षमय लढा देऊन चढल्या आहेत. त्यांच्या या संघर्षातूनच त्यांच्या आयुष्यातील उद्याची पहाट उगवणार आहे.

महिला दिनानिमित्त प्रत्येक नारीने ही शपथ घ्यावी की, मी स्त्रीभ्रूणहत्या करणार नाही आणि मुला-मुलीत दुजाभाव करणार नाही. स्त्रीवर होणाऱ्या अत्याचारांकडे दुर्लक्ष करणार नाही.

 

आपली प्रतिक्रिया द्या