खासदारांची अडीचकी आणि मोदींची झाडाझडती…

39
फोटो: पीटीआय

>>नीलेश कुलकर्णी   [email protected]

उत्तर प्रदेशमध्ये अनपेक्षितपणे जबरदस्त यश मिळाल्यामुळे पंतप्रधान मोदींनी सध्या शिस्तीच्या झाडूने झाडाझडती करण्याचे ठरवलेले दिसते. ‘सेंट्रल हॉलमध्ये नुसत्या चकाट्या पिटत बसू नका’ असे त्यांनी भाजपच्या खासदारांना सुनावले. त्याचा परिणामही दिसून आला. सध्या मोदी निवडक राज्यांच्या खासदारांना ‘ब्रेकफास्ट’साठी बोलवतात. मात्र तिकडे गेले की झाडाझडतीच असल्याने अनेक खासदारांच्या घशाखाली काही हा ब्रेकफास्ट उतरत नाही. विशेष म्हणजे खासदारांना आपल्याशी बोलताना कम्फर्टेबल वाटावे म्हणून स्थानिक खाद्यपदार्थ या ब्रेकफास्टमध्ये असतात. लोकसभेच्या खासदारांची निम्मी टर्म संपली आहे. बदल्यांची कामे करू नका, वैयक्तिक लाभाची कामे नको असे विनोबांनी गांधीजींना सांगितले तसे किंवा साने गुरुजींनी विद्यार्थ्यांना सांगितले तसे उपदेश मोदी करत असल्याने खासदार नाराज आहेत.

दहा-पंधरा लाखांचा मतदारसंघ कसा सांभाळायचा, कार्यकर्ते कसे जोडायचे, विरोधकांना कसे निपटायचे आणि काहीच कामे होत नसतील तर मग पुन्हा निवडून कसे यायचे? ही सगळी संकटे कमी होती काय म्हणून ते ‘आदर्श ग्राम’चे नसते ‘झेंगट’ मागे लावले आहे. मग आम्ही जगायचे तरी कसे हे तुम्हीच सांगा? असा सवाल बिचारे भाजप खासदार करत असतात. मात्र पत्रकारांबरोबर ‘मन’ मोकळे करणारी ही मंडळी मोदींपुढे गेले की ‘मौना’त जातात. कोणी हिंमत दाखवलीच तर मोदी सर्वांसमक्ष असे काही फटकारतात की ‘अबूचे खोबरे’ नको म्हणून न विचारलेले बरे असे मन मारून ही मंडळी मोदी उपदेश ऐकतात. एका खासदाराने ‘मोदीजी ऐसा ही चलेगा तो हम कैसे जितेंगे?’ असा प्रश्न केला. त्यावर वो चिंता आपकी नही मेरी है असे सांगत मोदींनी या खासदार महाशयाना उडवून लावले. त्यामुळे ‘चाय पे चर्चा’पेक्षाही हा ब्रेकफास्ट भयंकर आहे अशी कुजबूज सध्या भाजप खासदारांमध्ये आहे म्हणे!

आपली प्रतिक्रिया द्या