तोट्यातील 19 सरकारी कंपन्या बंद करण्याची केंद्र सरकारची मंजुरी

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

केंद्रातील मोदी सरकारने तोट्यात असणाऱ्या 19 सरकारी कंपन्या बंद करण्याला मंजुरी दिली आहे. ‘एचएमटी’, ‘हिंदुस्थान केबल्स’ आणि ‘इंडियन ड्रग्स’ यासारख्या सरकारी क्षेत्रातील 15 पेक्षा जास्त कंपन्यांना ताळे ठोकण्याची परवानगी सरकारने दिली आहे. या सर्व कंपन्या बऱ्याच काळापासून तोट्यात आहेत. काँग्रेसचे खासदार अॅड. अदूर प्रकाश यांच्या प्रश्नाला उत्तर देताना सरकारने संसदेत ही माहिती दिली आहे.

लोकसभेत काँग्रेसचे खासदार अॅड. अदूर प्रकाश यांनी उद्योग मंत्रालयाकडून खासगी क्षेत्रातील कंपन्यांबाबत माहिती मागितली होती. सरकार तोट्यात असणाऱ्या कंपन्या बंद करण्याचा किंवा खासगीकरण करण्याचा विचार करत आहे का? असा प्रश्न खासदार अॅड. अदूर प्रकाश यांनी विचारला होता. याला उत्तर देताना केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांनी तोट्यात असणाऱ्या सरकारी कंपन्यांची माहिती दिली. यासह बंद करण्यास मंजुरी दिलेल्या 19 सरकारी कंपन्यांची माहितीही दिली.

मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, तुंगभद्रा स्‍टील प्रोडक्‍ट्स लिमिटेड, एचएमटी वॉचेज लिमिटेड, एचएमटी चिनार वॉचेज लिमिटेड, एचएमटी बियरिंग्‍स लिमिटेड, हिंदुस्‍तान केबल्‍स लिमिटेड, एचएमटी लिमिटेड की ट्रॅक्‍टर यूनिट आणि इंस्‍ट्रूमेंटेशन लिमिटेडच्या कोटा यूनिट तसेच पेट्रोलियम मंत्रालयात अंतर्गत येणाऱ्या कंपन्यांसह आणखी 9 कंपन्यांना बंद करण्यास मंजुरी दिली आहे.