शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात सपशेल अपयशी ठरलेले मोदी सरकार आता सातत्याने शेतकऱ्यांचा अवमान करतेय. शेतकरीविरोधी काळे कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी तब्बल 378 दिवस सुरू असलेल्या मॅरेथॉन संघर्षात 700 शेतकऱ्यांनी बलिदान दिले. त्या शेतकऱ्यांवर भाजपा खासदाराद्वारे आरोप होणे हाच भाजपाच्या शेतकरीविरोधी नीती आणि धोरणांचा आणखी एक पुरावा आहे, अशा शब्दांत काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे.
शेतकऱ्यांविरोधी ही लज्जास्पद वक्तव्ये उत्तर प्रदेश, हरयाणा आणि पंजाबसह संपुर्ण देशातील शेतकऱ्यांचा घोर अवमान आहे. नरेंद्र मोदी आणि भाजपाला कितीही कटकारस्थाने रचू द्या, आम्ही शेतकऱ्यांना शेतमालाला किमान हमीभावाची गॅरंटी देतो, असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
कंगनाच्या बेताल वक्तव्यांमुळे भाजपची पळापळ
शेतकऱ्यांच्या आंदोलनात काही फुटीरतावादी घटक होते आणि जर कठोर कारवाई केली नसती तर देशात बांगलादेशसारखी परिस्थिती निर्माण झाली असती, अशी बेताल बकबक करणाऱ्या खासदार पंगना रनौत यांच्या या वक्तव्यावर विरोधी पक्ष आणि सोशल मीडियाने टीकेची झोड उठवल्यावर भाजपमध्ये पंगनाचे तोंड बंद करण्यासाठी पळापळ सुरू झाली आहे. आम्ही तिच्याशी सहमत नाही. तिला धोरणात्मक बाबींवर बोलण्याचा अधिकार दिलेला नाही. तिला तोंड बंद ठेवण्यास सांगितले आहे. भाजप आणि मोदी हे तर शेतकऱ्यांचे हितचिंतक आहेत, अशी सारवासारव भाजपने केली आहे.