मोदी सरकारची स्वातंत्र्यदिनाची भेट; तीन वर्षांत हिंदुस्थान दोन लाख सैनिकांना घरी पाठवणार!

‘आझादी का अमृतमहोत्सवा’मुळे एकीकडे देशभरात उत्साहाचे वातावरण असतानाच दुसरीकडे मात्र केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने सैन्य कपात करण्याच्या हालचाली सुरू केल्याचे धक्कादायक वृत्त आहे. येत्या दोन ते तीन वर्षांत हिंदुस्थानी लष्करातील तब्बल दोन लाख जवानांना घरी पाठवण्यात येणार आहे. दरम्यान 75व्या स्वातंत्र्यदिनाच्या मोदी सरकारच्या या गिफ्टमुळे सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.

हिंदुस्थानी सैन्यांत सध्या 12.80 लाख मनुष्यबळ आहे. त्यात दोन लाख कपात करून ही संख्या 10.80 लाख करण्यात येईल, अशी माहिती संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

लष्करात आधुनिकीकरणामुळे सैन्यकपात करणे गरजेचे असल्याचे कारण देण्यात येत असले तरी सैनिकांवर होणारा खर्च आणि निवृत्तीनंतर देण्यात येणाऱया पेन्शनचा भार कमी करण्यासाठी सैन्यकपात करण्याचा मार्ग अवलंबिला जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.

1.35 लाख मनुष्यबळ कमी असतानाही कपात

कोरोनामुळे गेली दोन वर्षे सैन्यभरती झालेली नाही. सैन्यात सध्या 1.35 लाखांचे मनुष्यबळ कमी आहे. तरीही सैन्य कपातीची तयारी सुरू केल्याची धक्कादायक माहिती आहे.

दरवर्षी साधारण 60 हजार सैनिक निवृत्त होतात. अग्निपथ योजनेमुळे दरवर्षी 35 हजार 40 हजार जणांची भरती होईल. तरीही सैनिकांचे संख्याबळ कमीच असणार आहे.

जम्मूकश्मीरात राष्ट्रीय रायफल्समध्येही कपात होऊ शकते

राष्ट्रीय रायफल्समध्ये सैन्य कपात होऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले. ही कपात झाली तर जम्मू-कश्मीरात राष्ट्रीय रायफल्सची पुनर्रचना होईल.

सध्या राष्ट्रीय रायफल्सच्या 63 बटालियन्स जम्मू-कश्मीरात तैनात आहेत. प्रत्येक बटालियनमध्ये सहा पंपन्या आहेत. एका कंपनीत 100 ते 150 सैनिक असून मेजर दर्जाचे अधिकारी कंपनी प्रमुख आहेत.