गर्भवती महिलांना मोदी सरकारच्या अजब सूचना

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली
गर्भधारणा झाल्यानंतर मांसाहार टाळा, शरीरसंबंध ठेवू नका, चांगले विचार करा, वाईट व घाणेरडे विचार मनात आणू नका अशा अजब सूचना मोदी सरकारच्या आयुष मंत्रालयाने देशातील गर्भवती महिलांना दिल्या आहेत.
आयुष मंत्रालयाने मदर अॅण्ड चाईल्ड केअर नावाच्या पुस्तकात गर्भवती महिलांना या सूचना दिल्या आहेत. तसेच यात महिलांनी गर्भधारणा झाल्यानंतर घरात धार्मिक फोटो लावावे, चांगल्या लोकांचा विचार करावा यामुळे तुम्हांला सुदृढ बाळ होईल असाही सल्ला या पुस्तकात देण्यात आला आहे. डॉक्टरांनी मात्र या सुचना फालतू असल्याचे म्हटले आहे.
हिंदुस्थानसारख्या विकसनशील देशातील अर्ध्याहून अधिक जनता गरीब आहे. त्यांना मिळेल ते अन्न खाऊन दिवस काढावे लागत आहेत. मांस हे काहीजणांचे मुख्य अन्न आहे. मांसामध्ये प्रथिनांचे प्रमाण अधिक असल्याने ते गर्भवती महिलेसाठी आवश्यक आहे, असे अपोलो हेल्थकेअर ग्रुपच्या स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर मालविका सभरवाल यांनी म्हटल आहे. तसेच गर्भधारणा सामान्य असल्यास सुरुवातीच्या तीन महिन्यानंतर शरीरसंबंध ठेवण्यास हरकत नाही, असेही डॉक्टरांनी म्हटले आहे. यामुळे मोदी सरकारच्या या सूचनांवरुन नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.