अबब! मोदी सरकारची ३,७५५ कोटींची जाहिरातबाजी

13

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

मोदी सरकारने आपल्या कार्यकाळातील साडेतीन वर्षात जवळपास ३,७५५ कोटी रुपये जाहिरातींवर खर्च केले आहेत. माहिती अधिकारातून ही माहिती समोर आली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने माहिती अधिकारात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली. इलेक्ट्रॉनिक, प्रिंट मीडिया आणि इतर जाहीरातींवर मोदी सरकारने एप्रिल २०१४ ते ऑक्टोबर २०१७ पर्यंत जवळपास ३,७५५ कोटी रुपये खर्च केले आहेत.

नोएडाचे माहिती अधिकार कार्यकर्ते रामवीर तंबर यांनी ही माहिती मागवली होती. मिळालेल्या माहितीनुसार, रेडिओ, डिजिटल सिनेमा, दूरदर्शन, इंटरनेट, मेसेज, इलेक्टॉनिक मीडिया आणि टीव्हीवर मोदी सरकारने १६५६ कोटी रुपये खर्च केले आहेत. प्रिंट मीडियातील जाहिरातींवर सर्वाधिक १६९८ कोटी रुपये खर्च केले आहेत. तसेच होर्डिंग, पोस्टर, बूकलेट इत्यादींच्या माध्यमातून ३९९ रुपये खर्च केले आहेत.

तंवर यांनी २०१६ मध्येही माहितीच्या अधिकारअंतर्गत याबाबत माहिती माहिती मागवली होती. त्यामध्ये जून २०१४ पासून ऑगस्ट २०१५ पर्यंत अशा जाहिरातींवर ११०० कोटी खर्च केले होते. या जाहिरातींमध्ये मोदींना दाखवण्यात आलं होतं.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मोदी सरकारने जाहिरातींवर जून २०१४ ते ३१ मार्च २०१५मध्ये ४४८ कोटी खर्च केले. एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१६मध्ये ५४२ कोटी खर्च केले. १ एप्रिल २०१६ ते ३१ ऑगस्टदरम्यान १२० कोटी खर्च केले. जुलै २०१५ पर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या जाहिरीत साठी जवळपास ८.५ कोटी रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती आरटीआयमध्ये उघड झाली होती.

आपली प्रतिक्रिया द्या