मोदी सरकार खासदारांना मजुरांसारखं वागवतंय! – नरेश अग्रवाल

16

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

संसद अधिवेशनात विधेयकांची संख्या जास्त असल्याने राज्यसभेचे कामकाज रात्री १० वाजेपर्यंत चालेल. हा प्रकार रोजंदारीवरील कामगारांसारखाच झाला, असे सांगतानाच मोदी सरकार आम्हा खासदारांना मजुरांसारखे वागवत आहे, असा आरोप समाजवादी पार्टीचे खासदार नरेश अग्रवाल यांनी आज केला.

केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी राज्यसभेत मंजूर होणाऱया विधेयकांची यादी वाचून दाखवली. त्यावर बोलताना अग्रवाल यांनी वरील आरोप केला. ज्या विधेयकांची यादी वाचून दाखवण्यात आली त्याबाबतचे आक्षेप आम्ही कधी नोंदवायचे, असा सवाल त्यांनी केला. सरकारने विधेयकाच्या नावे आमच्यावर काही लादण्याचा प्रयत्न केला तर आम्ही विरोध करणारच, असेही अग्रवाल यांनी ठणकावले.

तुम्ही शून्य प्रहरही संपवले आहेत. तुम्हाला वाटत असल्यास अधिवेशनाची मुदत आठवडाभरासाठी वाढवा, असेही त्यांनी सुचवले. ७ ऑगस्टला सुट्टी आहे. ८ तारखेला राज्यसभेचे कामकाज आहे. ९ ऑगस्टला ‘छोडो भारत’ घोषणेचा महोत्सव आहे. १० तारखेला सभापती म्हणजे उपराष्ट्रपतींचा निरोप समारंभ आहे. ११ ऑगस्टला नवे सभापती येतील. यात विधेयके मंजूर कशी होणार?
-नरेश अग्रवाल, खासदार समाजवादी पार्टी

मुगलसराय स्टेशनचे नाव बदलण्यावरून राज्यसभेत वादंग
देशातील एक महत्त्वाचे रेल्वे स्टेशन असलेल्या मुगलसराय रेल्वे स्टेशनला जनसंघाचे दिवंगत नेते दीनदयाळ उपाध्याय यांचे नाव देण्याच्या सरकारच्या इराद्यावरून आज राज्यसभेत मोठे वादंग झाले. राज्यसभेचे कामकाज सुरू होताच समाजवादी पार्टीचे खासदार नरेश अगरवाल यांनी नियम २६७ अंतर्गत या विषयाला हात घातला. देशातील रेल्वे स्टेशनला माणसांची नावे दिली जात नाहीत. मग मुगलसराय स्टेशनला दीनदयाळ उपाध्याय यांचे नाव देण्याचे औचित्यच काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यावर प्रतिवाद करताना संसदीय कामकाज राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी यापूर्वीही मुंबईतील रेल्वे स्थानकाला राणी व्हिक्टोरिया त्यानंतर त्याचे नामकरण छत्रपती शिवाजी टर्मिनस केले होते याकडे सभागृहाचे लक्ष वेधले. त्यामुळे गोंधळ अधिकच वाढला व परिणामी कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब करावे लागले.

आम्ही दहशतवादी टिपून मारतोय
हिंदुस्थानात दहशतवादी घुसविण्याचे पाकिस्तानचे कारनामे सुरूच आहेत. मात्र आम्ही जशास तसे उत्तर देत अनेक घुसखोरांना टिपून मारले आहे आणि पुढेही ही कारवाई सुरूच राहील, अशी माहिती संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी आज लोकसभेत दिली.

आपली प्रतिक्रिया द्या