इस्रायल: हॉटेलमध्ये स्फोट झाले तरी मोदी सुरक्षित राहतील!

सामना ऑनलाईन । जेरुसलेम

‘यह जगह इतनी सुरक्षित है की, परिंदा भी पर नही मार सकता’, या हिंदी सिनेमातील डायलॉग प्रमाणेच इस्रायल दौऱ्यावर असणाऱ्या पंतप्रधान मोदींना अत्यंत सुरक्षित जागी पाहुणचार देण्यात येत असल्याची माहिती मिळते. वृत्तपत्रांनी वर्णन केल्यानुसार ‘जेम्स बॉन्ड’च्या सिनेमात जशी कल्पनेच्या पलिकडली अत्याधुनिक सुरक्षा व्यवस्था दाखवण्यात येते त्यालाही मागे टाकेल इतकी ‘जबरी’ सुरक्षा व्यवस्था मोदींना देण्यात आल्याचं समजतं आहे.

सतत युद्धाला सामोरे जाणाऱ्या इस्रायलमध्ये नरेंद्र मोदी अगदी सुखरुप राहावे म्हणून त्यांच्या निवासाची चोख व्यवस्था ठेवण्यात आली आहे. हॉटेलवर बॉम्ब हल्ला किंवा रासयनिक हल्ला देखील परिणामकारक ठरणार नाही, इतक्या सुरक्षित अशा ‘द किंग डेव्हीड’ नावाच्या हॉटेलमध्ये त्यांना उतरवण्यात आलं आहे.

‘हॉटेल बॉम्बने उडवण्यात आलं तरी पंतप्रधान मोदींच्या खोलीला धक्काही लागणार नाही,’ असं किंग डेव्हीड हॉटेलचे संचालक (ऑपरेशन्स) शेल्डन रिट्झ यांनी सांगितल्याचं टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तात म्हटलं आहे.

कसं आहे ‘द किंग डेव्हीड’ हॉटेल? पाहा व्हिडिओ:

हिंदुस्थानचे पंतप्रधान इस्रायलाच्या दौऱ्यावर येण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे त्यांचे जंगी स्वागत तर झालेच पण त्यासोबत अत्यंत सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. हॉटेलच्या तब्बल ११० खोल्या हिंदुस्थानचे पंतप्रधान आणि त्यांच्या शिष्टमंडळासाठी रिकाम्या ठेवण्यात आल्या आहेत. याआधी हॉटेलमध्ये अमेरिकेचे या शतकातले सर्व राष्ट्राध्यक्ष राहून गेले आहेत. बिल क्लिंटन, जॉर्ज बुश, बराक ओबामा आणि आता तीन आठवड्यांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील इथेच पाहुणचार घेतला होता. आता हिंदुस्थानचे पंतप्रधान मोदी यांना देखील तशाच पद्धतीचा पाहुणचार दिला जात असल्याचंही हॉटेलकडून सांगण्यात आलं.

मोदी शाकाहारी असल्याने त्यांच्या जेवणाची इथे पुरेपूर काळजी घेण्यात आली असून कुकीजदेखील एगलेस आणि शुगरलेस असतील, यावर लक्ष देण्यात आलं आहे. मोदींच्या ‘सूट’ मध्ये स्वतंत्र किचनची सोय आहे. हिंदुस्थानी पदार्थांसाठी आवश्यक सामुग्री सज्ज ठेवण्यात आली असली तरी सर्व पदार्थ ‘कोशर’ म्हणजे ज्यू आहार कायद्याच्या नियमावलीत बसणारे आहेत, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

हे हॉटेल डॅन हॉटेल्सचा भाग आहे. डॅन हॉटेल्सच्या साखळीतलं एक हॉटेल लवकरच बेंगळुरू इथे सुरू होणार आहे. ते हॉटेल देखील इतकं सुरक्षित असेल का याची माहिती मात्र देण्यात आलेली नाही.

पाहा फोटोगॅलरी:

आपली प्रतिक्रिया द्या