पाकिस्तानला कायमचा धडा शिकवण्यासाठी मोदीच पंतप्रधान हवेत – राम शिंदे

सामना प्रतिनिधी । जामखेड

जगात आपली मान अभिमानाने उंचावण्यासाठी व पाकिस्तानला कायमचा धडा शिकवण्यासाठी व देशातील प्रत्येक बेघर नागरीकाला आपल्या हक्काचे घर मिळण्यासाठी नरेंद्र मोदी हेच योग्य पंतप्रधान आहेत, असे पालकमंत्री राम शिंदे यांनी डॉ. सुजय विखे यांच्या प्रचार सभेत व्यक्त केले.

जामखेडमधील शिवाजीनगर, संताजीनगरमध्ये प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी उमेदवार डॉ. सुजय विखे, सभापती सुभाष आव्हाड, डॉ.भगवानराव मुरूमकर, सुर्यकांत मोरे, रवी सुरवसे, नगराध्यक्ष निखिल घायतडक, अर्चना राळेभात, सोमनाथ राळेभात, सोमनाथ पाचरणे, पोपट राळेभात, महेश निमोणकर, राजेश वाव्हळ, अमित चिंतामणी, कविता जगदाळे, प्रवीण सानप, सुधीर राळेभात, मकरंद काशिद, छोटु राळेभात, गणेश राळेभात, राहुल राऊत, अरूण मस्के, प्रा. अरुण वराट, कैलास वराट, अशोक मुळे, गोरख घनवट यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना पालकमंत्री शिंदे म्हणाले की, पाकिस्तानला धडा शिकवण्याची हिंमत पंतप्रधान मोदी यांनी दाखवली. त्यामुळे प्रत्येक भारतीयांचा मान, अभिमान व स्वाभिमान उंचावला आहे. वेगवेगळ्या अनुदान योजनेतील भ्रष्टाचार कमी करून अनुदान थेट लाभधारकाच्या खात्यात जमा होत आहे. जामखेडच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी आणला त्यातून अनेक मुलभूत प्रश्न मार्गी लागले आहेत. मतदारसंघातील एकही गाव पक्या रस्त्यापासून वंचित राहिले नाही. जामखेड शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न १०४ कोटी रुपयांचा आराखडा असणारा आचारसंहिता संपल्यानंतर लवकरात लवकर मार्गी लावणार आहे, असे पालकमंत्री शिंदे यांनी सांगितले.

यावेळी बोलताना उमेदवार डॉ. सुजय विखे म्हणाले की, ही निवडणूक विचारांची आहे. मतदान करताना सद्सद् विवेक बुद्धीने मतदारांनी मतदान करण्याचे आवाहन केले. मतदान करताना दोन्ही उमेदवारांची कौटुंबिक पार्श्वभूमी तपासा समोरच्या उमेदवाराची सखोल माहिती घ्या आणि मग मतदान करा. कुणाची दहशत, गुंडगिरी आहे हे पहा आणि लोकसभेत सर्वात उच्चशिक्षित खासदार पाठवा. तालुक्यातील आरोग्यसेवा उपलब्ध करण्यासाठी केंद्राकडून अत्याधुनिक प्रकल्प उभारू तसेच दर्जात्मक शिक्षणासाठी भव्य दिव्य असे सर्व शाखा व सुविधांनी युक्त शैक्षणिक संकुल उभारू, असेही विखे म्हणाले.

जामखेड शहराची भरभराट ही मुबलक पाणी मिळणारे शहर म्हणून झाली तर कर्जतला पाण्याची टंचाई होती. आता मात्र उलट परिस्थिती निर्माण झाली आहे. कर्जतला मुबलक पाणी उपलब्ध आहे. तर जामखेड शहरात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. आचारसंहिता संपल्यानंतर उजणी धरणातून पाणीपुरवठा योजना मी मार्गी लावणार आहे. पुढील पन्नास वर्षे तरी शहराला पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नाही.

आपली प्रतिक्रिया द्या