मोदींच्या ५०च्यावर सभा रोड शो, डिजिटल सभाही होणार

24

सामना ऑनलाईन । गांधीनगर

भाजपसाठी प्रतिष्ठेच्या बनलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच पक्षाचे स्टार प्रचारक असणार आहेत. पंतप्रधान मोदींच्या तब्बल ५० ते ७० जाहीर सभा होणार आहेत.

९ आणि १४ डिसेंबरला दोन टप्प्यांत होणाऱ्या गुजरात विधानसभा निवडणुकीचे रण गेल्या काही दिवसांपासून तापले आहे. भाजपकडून निवडणूक प्रचाराची रणनीती आखण्यात आली असून पंतप्रधान मोदींच्या ५० ते ७० सभा होतील. दक्षिण गुजरात, सौराष्ट्र, कच्छ, मध्य गुजरात अशा राज्याच्या सर्व भागात पंतप्रधान सभा घेतील असे भाजपच्या सूत्रांनी सांगितले.

या आधी पंतप्रधान मोदींच्या १५ ते १८ सभा घेण्याचे नियोजन भाजपने केले होते, मात्र गुजरात विधानसभेची निवडणूक प्रतिष्ठsची असल्याने ५० वर जाहीर सभा होतील. तसेच रोड शोचेही विविध शहरांत आयोजन केले जाणार आहे. प्रचारासाठी पंतप्रधानांकडून डिजिटल मीडियाचाही वापर केला जाईल. सोशल मीडियाचाही भाजप प्रचारासाठी प्रभावी वापर करेल असे भाजप सूत्रांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री आदित्यनाथ स्टार प्रचारक असणार
पंतप्रधान मोदी, पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्याप्रमाणेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेही भाजपचे स्टार प्रचारक असतील. आदित्यनाथ यांच्याही अनेक सभा होतील असे सूत्रांनी सांगितले.

हार्दिक पटेल यांचा काँग्रेसला पाठिंबा
अहमदाबाद – भाजपविरुद्ध रणशिंग फुकणारे पाटीदार आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल यांनी काँग्रेस पक्षाला पाठिंबा देणार असल्याचे स्पष्ट संकेत आज दिले. गुजरातमधील १८२ मतदारसंघांपैकी तब्बल ६० वर मतदारसंघांमध्ये पाटीदार समाजाचे वर्चस्व आहे. पाटीदार समाजाला ओबीसी प्रवर्गाचा दर्जा आणि शिक्षण व नोकऱयांत आरक्षणाची आमची मागणी आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी आमची मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती हार्दिक पटेल यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या