कलाकेंद्रा विरोधात मोहा ग्रामस्थांचे आमरण उपोषण सुरू

196

सामना प्रतिनिधी । जामखेड

संपूर्ण ग्रामस्थांचा कलाकेंद्राला विरोध असतानाही जिल्हा प्रशासनाने कलाकेंद्राला परवानगी दिली आहे. त्याच्या निषेधार्थ मोहा ग्रामस्थांनी शनिवारी गावातच आमरण उपोषण सुरू केले आहे. तसेच येणाऱ्या विधानसभा व लोकसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच गावात एकाही शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना येऊ न देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच परिसरातील शाळा, विद्यालये, महाविद्यालये सोमवारपासून बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. आजपासून उपोषण सुरू झाले आहे.

जामखेड तालुक्यातील मोहा ग्रामपंचायत व हापटेवाडी, रेडेवाडी, नाणेवाडी, मोहा या परिसरातील ग्रामस्थांचा कलाकेंद्रांना कडाडून विरोध होता. यासाठी वेळोवेळी आंदोलने झाली होती. ग्रामस्थांनी २०१६ ते २०१८ मध्ये तीन ग्रामसभा घेऊन एकमुखी कलाकेंद्र बंदचा ठराव मंजूर केला होता. तसेच आक्टोबर २०१८ मध्ये ग्रामस्थ महिला व शालेय विद्यार्थ्यांनी जामखेड बीड रोडवर रास्तारोको आंदोलन केले होते. ग्रामस्थ जिल्हाधिकाऱ्यांना भेटले होते. त्यावेळी २००६ पासून जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेणे आवश्यक होते परंतु तहसीलदारांच्या परवानगीवर कलाकेंद्र सुरू होते. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी नोव्हेंबर २०१८ मध्ये बंदचा आदेश दिला होता. त्यामुळे ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर आनंदोत्सव साजरा केला होता.

नुकतेच प्रशासनाने कलाकेंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ग्रामस्थांनी या निर्णयाच्या विरोधात तहसीलदार यांना निवेदन देऊन कलाकेंद्र बंद न झाल्यास दि. २३ पासून मोहा गावातच आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार आजपासून ग्रामस्थ गावातील महादेव मंदिरासमोर उपोषणास बसले आहेत.

मोहा हे गाव पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांचे दत्तक गाव आहे. व याच गावातील नागरिकांना कलाकेंद्र बंदसाठी प्रशासनाच्या विरोधात झगडावे लागत आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

दैनिक सामनाशी बोलताना सरपंच शिवाजी डोंगरे म्हणाले की, कलाकेंद्रांमुळे परिसरात अनेक अवैध धंदे वाढले आहेत. संपूर्ण ग्रामस्थांचा या निर्णयाला विरोध आसतानाही जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे. आम्ही सोमवार पासून परिसरातील पाच जिल्हा परिषद शाळा, दोन माध्यमिक व दोन उच्च माध्यमिक विद्यालये बंद ठेवणार आहेत. तसेच एकाही शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना आम्ही गावात येऊ देणार नाहीत. व येत्या विधानसभा व लोकसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.

एकीकडे मोहा ग्रामस्थांचे कलाकेंद्राविरोधात तीव्र स्वरूपाचे आंदोलन सुरू असताना सुमारे एक हजार कलाकारांसाठी उदरनिर्वाहाचे साधन असणारे कलाकेंद्र जर बंद झाले तर मात्र या कलाकारांवर उपासमारीची वेळ येणार आहे. त्यामुळे कलाकेंद्र सुरूच ठेवावेत. आम्ही शासकीय नियमाचे काटेकोर पालन करू असे कलाकारांचे म्हणणे आहे.

आपली प्रतिक्रिया द्या