सरसंघचालक भागवत हे तर ‘राष्ट्रपिता’, इमाम संघटनेच्या प्रमुखांची स्तुतिसुमने

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत हे राष्ट्रपिता आणि राष्ट्राचे ऋषी असल्याचे अखिल भारतीय इमाम संघटनेचे प्रमुख उमर अहमद इलियासी यांनी म्हटले आहे. मुस्लीम आणि हिंदूंचा डीएनए एकच आहे. फक्त अल्लाहची उपासना करण्याची पद्धत वेगळी असल्याचेही इलियासी यांनी सांगितले. मोहन भागवत यांनी आज इलियासी यांची कस्तुरबा गांधी मार्गावरील मशिदीत भेट घेतली. या दोघांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली. या वेळी भागवत यांच्यासोबत संघाचे पदाधिकारी कृष्णा गोपाळ, रामलाल आणि इंद्रेश कुमार उपस्थित होते.

भागवत यांनी या वेळी हिजाबचा वाद, ज्ञानवापी यावरही इलियासी यांच्याशी चर्चा केल्याचे सांगण्यात येते. मोहन भागवत देशातील जातीय सलोखा मजबूत करण्यासाठी मुस्लीम विचारवंतांशी चर्चा करत आहेत. अलिकडेच त्यांनी दिल्लीचे माजी लेफ्टनंट गव्हर्नर नजीब जंग, माजी मुख्य निवडणूक आयुक्त एसवाय कुरेशी, अलीगड मुस्लीम विद्यापीठाचे माजी कुलगुरू लेफ्टनंट जनरल जमिरुद्दीन शाह, माजी खासदार शाहीद सिद्दिकी आणि उद्योगपती सईद शेरवानी यांची भेट घेतली होती.