ब्रिटीश राजवटीपूर्वी देशात 70 टक्के लोकसंख्या साक्षर होती; बेरोजगारी नव्हती, मोहन भागवत यांचा दावा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांनी रविवारी सांगितले की, ब्रिटिश राजवटीपूर्वी हिंदुस्थानातील 70 टक्के लोकसंख्या साक्षर होती. भागवत पुढे म्हणाले की, देशात त्यावेळी बेरोजगारीचा प्रश्नच नव्हता.

इंद्री-कर्नाल रोडवरील मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या उद्घाटनानंतर एका मेळाव्याला संबोधित करताना सरसंघचालकांचं हे विधान समोर आलं आहे.

‘ब्रिटिश राजवटीपूर्वी, आपल्या देशातील 70 टक्के लोकसंख्या शिक्षित होती आणि बेरोजगारी नव्हती. तर इंग्लंडमध्ये फक्त 17 टक्के लोक शिकलेले होते’, मोहन भागवत म्हणाले.

‘ब्रिटिशांनी त्यांचे शैक्षणिक मॉडेल हिंदुस्थानात लागू केले आणि आमचे मॉडेल त्यांच्या देशात लागू केले. अशा प्रकारे ते 70 टक्के साक्षर झाले, आणि आम्ही 17 टक्के शिक्षित झालो’, असे सरसंघचालक म्हणाले.

‘आपली शिक्षण व्यवस्था केवळ रोजगारासाठी नव्हती तर ती ज्ञानाचे माध्यमही होती. शिक्षण स्वस्त आणि सर्वांना उपलब्ध होते. त्यामुळे शिक्षणाचा सर्व खर्च समाजाने उचलला आहे आणि या शिक्षणातून पुढे आलेले विद्वान, कलावंत आणि कारागीर जगभर ओळखले गेले’, असेही ते म्हणाले.

दरम्यान, यावेळी भागवत यांनी आत्म मनोहर मुनी आश्रमाने सामान्य जनतेला आरोग्य सुविधा देण्यासाठी रुग्णालय बांधण्यासह केलेल्या कामाचे कौतुक केले.

भागवत म्हणाले की, ‘सर्वांसाठी आरोग्य आणि शिक्षण ही आपल्या देशाची सर्वात मोठी गरज आहे, कारण वैद्यकीय सेवा आणि शिक्षण दोन्ही महाग होत आहेत आणि सामान्य माणसाला स्वस्त दरात वैद्यकीय सेवा आणि शिक्षण सुलभतेने मिळण्याची गरज आहे.’

‘आम्ही फक्त स्वतःसाठी जगत नाही. आपली संस्कृती आणि परंपरांमध्ये सर्वजन हिताय-सर्वजन सुखाय (सर्वांचे कल्याण-सर्वांसाठी आनंद) ही भावना आहे’, ते म्हणाले की, समाज बळकट केल्यास लोकांना देशात चांगल्या गोष्टी घडताना दिसतील.